विसरत चाललेले बालपण — अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली निष्पाप स्वप्नं
✍️ लेखिका : सौ. श्रुती सुनील पवार-जगताप, महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त पत्रकार व समाजसेविका
बालपण...! हे एक असं शब्द आहे ज्यात निरागसता, आनंद, आणि बंधनमुक्त जीवनाचा संपूर्ण अर्थ सामावलेला आहे. बालपणीचा काळ हा खरोखरच सुखाचा असतो. त्या वयात आपल्याला चिंता, स्पर्धा, अपेक्षा या शब्दांचा अर्थही माहीत नसतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खेळण्यात, हसण्यात, आणि लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात दिवस जायचे. विट्टी-दांडू, खो-खो, कबड्डी, सागरगोटे, लपंडाव — असे कितीतरी खेळ आपल्या लहानपणाचे अविभाज्य अंग होते. पण आजच्या मुलांकडे पाहिलं की असं वाटतं — बालपण हरवतंय, हरवतंय ती निरागसता, हरवतंय तो निष्काळजी हसरा काळ.
आजच्या पिढीवर अपेक्षांचं ओझं खूप जड झालं आहे. लहान वयातच अभ्यास, स्पर्धा, आणि करिअरची शर्यत सुरू होते. पहिलीत असलेलं मूलही आज दिवसातून शाळा, ट्युशन, क्लासेस, आणि गृहपाठ यांच्या भोवऱ्यात अडकलेलं दिसतं. पालक आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून सतत धडपड करत असतात, पण नकळतपणे ती धडपड मुलांच्या आनंदावर गदा आणते. आज प्रत्येक पालकाला आपलं मूल हुशार व्हावं, पहिलं यावं, आणि समाजात नाव कमवावं असं वाटतं — पण या अपेक्षांच्या पाठीमागे बालपण दडपून जातंय, हे लक्षातच घेतलं जात नाही.
मुलांच्या पाठीवरचं दप्तर जड झालं आहे, आणि त्याहून अधिक जड झालं आहे त्यांच्या मनावरचं दडपण. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, गृहपाठ, प्रोजेक्ट्स, आणि क्लासेस यांच्या ओझ्याखाली ते थकलेले असतात. खेळण्यासाठी वेळ नाही, गप्पा मारायला वेळ नाही, आणि सर्वात वाईट म्हणजे — स्वतःसाठी जगायला वेळ नाही. समाजात स्पर्धा एवढी वाढली आहे की बालकपणीच “मोठं होण्याची” घाई सुरू झाली आहे.
याचं परिणाम केवळ मानसिक नाही, तर शारीरिक आरोग्यावरही होत आहे. बालवयात वाढतं वजन, तणाव, हृदयविकार, आणि नैराश्य — ही शब्दं आजच्या मुलांच्या आयुष्यात खूप सहजपणे ऐकायला मिळतात. कारण त्यांच्या आयुष्यात खेळ नाही, हालचाल नाही, हसण्याचं कारण नाही. टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम आणि सोशल मीडियाने त्यांच्या जगाला एक लहान चौकट दिली आहे. पण त्या चौकटीबाहेर जे वास्तव आहे, ते ते गमावत आहेत.
पूर्वीच्या काळात संध्याकाळी गावच्या मैदानावर, गल्लीच्या कोपऱ्यावर मुलांचा खेळता खेळता उठलेला धुरळा दिसायचा. आता तो दृश्य फक्त आठवणीत उरला आहे. शाळा संपल्यानंतर ट्युशनला धाव, मग गृहपाठ, आणि नंतर मोबाईलचा स्क्रीन — एवढंच त्यांचं “जीवन” राहिलं आहे. त्या छोट्या वयातच मोठ्यांच्या जगात त्यांनी प्रवेश केला आहे. पण त्यांच्या लहानशा मनातील आनंद, कल्पकता आणि निरागसतेला जागाच उरलेली नाही.
पालक आणि शाळा हे दोघेही यासाठी जबाबदार आहेत असं वाटतं. मोठ्या शाळेत मुलांना घालणे, भरमसाठ फी भरणे, महागड्या ट्युशन्स — यामध्ये शिक्षणाचं मोल नाही, तर प्रतिष्ठेचं प्रदर्शन जास्त दिसतं. काही पालक आपल्या मुलांना “सर्वोत्कृष्ट” बनविण्याच्या प्रयत्नात त्यांचं बालपण हिरावून घेत आहेत. मुलं प्रत्येक बाबतीत पहिलीच आली पाहिजे, ही मानसिकता त्यांच्यावर अन्याय करते. प्रत्येक मूल एकसारखं नसतं — बुद्धिमत्ता, आवड, क्षमता आणि संवेदनशीलता या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. आपल्या हाताची पाच बोटं जशी एकसारखी नसतात, तशीच मुलांची कौशल्यंही भिन्न असतात. मग सगळ्यांकडून एकसारख्या अपेक्षा का? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारावा.
बालपण म्हणजे खेळ, उत्साह आणि स्वातंत्र्य. मुलांना अभ्यासाबरोबरच खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, आणि स्वतःचं जग तयार करण्यासाठी मोकळीक हवी असते. शाळा, पालक आणि शासन या तिघांनी मिळून जर बालकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची जबाबदारी घेतली, तर हरवलेलं बालपण पुन्हा फुलवता येईल. समाजाने हे मान्य करायला हवं की, प्रत्येक मूल वेगळं आहे — काही कला क्षेत्रात चमकतात, काही शिक्षणात, काही खेळात, तर काही समाजकार्यात. प्रत्येकाचं तेज वेगळं असतं.
मोठ्या शाळेत शिकणं, मोठ्या क्लासमध्ये जाणं म्हणजे मोठं यश नाही. साध्या शाळांमधूनही अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर पोहोचले आहेत. खरा हिरा तो कुठेही असेल तरी चमकतोच. आज समाजाला गरज आहे ती पालक, शिक्षक आणि शासन यांनी एकत्र येऊन मुलांचं बालपण वाचवण्याची.
एकदा सरलेलं बालपण परत येत नाही — म्हणूनच मुलांवर अपेक्षांचं ओझं न टाकता त्यांना त्यांच्या गतीने वाढू द्या, खेळू द्या, बागडू द्या, आणि माणूस म्हणून घडू द्या. कारण आनंदी बालपणाचं बीजच उज्ज्वल भविष्यासाठी रुजतं.

0 Comments