आजच्या समाजात प्रत्येकजण नात्यांमध्ये, व्यवहारांमध्ये किंवा व्यावसायिक करारांमध्ये कागदोपत्री प्रक्रिया स्वीकारतो. परंतु दुर्दैवाने बहुतेक लोक सही करण्याअगोदर त्या दस्तऐवजाचा नीट अभ्यास करत नाहीत. अनेक वेळा आपण भावनेच्या भरात, नात्यांवर विश्वास ठेवून किंवा तातडीच्या गरजेत कोणत्याही कागदावर सही करतो. नंतर जेव्हा वाद, गैरसमज, आर्थिक नुकसान किंवा कौटुंबिक मतभेद निर्माण होतात तेव्हा तोच कागद आपल्याला अडकवतो.
हायकोर्टमध्ये सर्रास दिसणारे प्रकरण म्हणजे – लोकांनी वाचून न पाहिलेल्या दस्तऐवजावर केलेली सही. एखादा करार, विक्रीपत्र, तडजोड करार, कर्जाचे कागदपत्र किंवा अगदी नातेवाईकांत झालेला जमीनवाटपाचा करार – हे सारे कागद कायद्याच्या दृष्टीने साक्षीदार ठरतात. न्यायालय नेहमी दस्तऐवजालाच प्राथमिकता देते. कारण कागदावरची सही म्हणजे आपली संमती आणि मान्यता.
सहीपूर्वीची खबरदारी:
दस्तऐवज वाचल्याशिवाय सही करू नका : अगदी लहानशा करारातसुद्धा लपविलेले अटी असू शकतात. कायद्याचा सल्ला घ्या. अॅडव्होकेटच्या मार्गदर्शनाखाली कागद समजून घ्या. कायद्याची भाषा सामान्य व्यक्तीस गुंतागुंतीची वाटते, परंतु तिचे योग्य स्पष्टीकरण तज्ज्ञच देऊ शकतो. साक्षीदारांचा विचार करा. कधी कधी साक्षीदार केवळ औपचारिकतेसाठी घेतले जातात, पण त्यांचे महत्त्व नंतर वादात प्रकर्षाने समोर येते. विश्वासावर सही करू नका. नातेवाईक, जवळचे मित्र किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याबरोबरही व्यवहार लिहिताना शंका न घेता पारदर्शकता ठेवावी. भाषा समजली नाही तर विचारणा करा. कागद कोणत्याही भाषेत असो – मराठी, इंग्रजी किंवा हिंदी – तुम्हाला तो समजला नाही तर सही टाळावी.
कायद्याचा दृष्टिकोन
भारतीय करार अधिनियम (Indian Contract Act), नोंदणी अधिनियम (Registration Act), व भारतीय पुरावा अधिनियम (Indian Evidence Act) हे दस्तऐवजांबाबत स्पष्ट दिशा देतात. कोणत्याही करारावर सही केल्यास तो वैध मानला जातो, जोपर्यंत तो दबावाखाली, फसवणूक करून किंवा भ्रम निर्माण करून घेतलेला नाही हे सिद्ध होत नाही. पण हे सिद्ध करण्याची जबाबदारी सही करणाऱ्यावरच येते. नातेसंबंधातील विश्वासामुळे अनेकदा लोक फसतात. “आपल्या माणसाने कधी फसवेल?” या भावनेतून केलेली सही नंतर घराची, जमिनीची किंवा व्यवसायाची हानी करून जाते. न्यायालयात अशा प्रकरणांत “कागद बोलतो आणि भावना गप्प बसतात” असे चित्र असते. जगातील प्रत्येक नातं, व्यवहार किंवा करार शेवटी एका कागदावर स्पष्ट होतं. आई-वडिलांची वसीयत, भावंडांतली वाटणी, व्यावसायिक भागीदारी किंवा अगदी कर्ज व्यवहार – सर्वकाही कागदावर ठरते. आणि तो कागद नातेसंबंधातील चांगुलपणा जपतो की तोडतो हे सही करण्याआधी घेतलेल्या काळजीवर अवलंबून असते.
सावधानता हीच सुरक्षा : हायकोर्ट अॅडव्होकेट म्हणून माझा अनुभव सांगतो की, प्रकरण न्यायालयात आल्यानंतर लोक म्हणतात – “आम्ही विश्वास ठेवला म्हणून सही केली, पण वाचलं नाही.” त्या वेळी पश्चात्ताप करून काहीही साध्य होत नाही. म्हणून प्रत्येकाला माझा ठाम संदेश आहे : सही करण्याआधी नीट वाचा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कायदा समजून घेणे हे तुमचा हक्क आहे, तो वापरा. नाती जपायची असतील तर व्यवहार पारदर्शक ठेवा. आजच्या युगात विश्वासाला महत्त्व आहेच, पण कायदेशीर सुरक्षिततेला त्याहून अधिक महत्त्व आहे. सही करण्याआधी घेतलेली थोडीशी खबरदारी भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवते. लक्षात ठेवा – “नंतर नाती आणि व्यवहार एक कागद स्पष्ट करतो; म्हणून सही करण्याअगोदर खात्री करा.”
शंकर चव्हाण, अॅडव्होकेट, हायकोर्ट मुंबई
+91 7030907069


0 Comments