मैत्रीचे नाते

 


मैत्रीचे नाते

✍🏻 श्रुती पवार – महाराष्ट्र रत्न

नुकताच फ्रेंडशिप डे होऊन गेला, त्यानिमित्ताने काही शब्द...

मैत्री ही निखळ असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नको.
मैत्री म्हणजे आपल्या मनातल्या भावना ओळखणारा मित्र किंवा मैत्रीण. कोणतीही गोष्ट न सांगता आपण अडचणीत असलो तरी आपल्या मित्राला ते समजते – ही खरी मैत्री.

आजकाल आपण पाहतो, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर अनेक मित्र-मैत्रिणी असतात. पायलीचे पन्नास, पण खरेच ते कामाचे असतात का? हा साधा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.

"ते लांबून निभावणारी मैत्री" – फक्त लाईक करण्यापुरतीच असते. प्रत्यक्षात भेट होत नाही, संवाद होत नाही. मग अशा मैत्रीला अर्थच काय?


मैत्री ही वय पाहून होत नाही. सारख्या विचारांची माणसं एकत्र आली, की मैत्री होते. तिला ना जात असते, ना धर्म. ती असते फक्त "निखळ भावना".

मैत्री विश्वासावर टिकते. गोड क्षणांनी ती बहरते. श्रीकृष्ण-सुदामाची मैत्री याचे उत्तम उदाहरण.

आजकाल काही मैत्र्या स्वार्थापुरत्या असतात. पूर्वीची मैत्री स्वच्छ, निर्मळ होती. जीवाला जीव देणारी, शब्दाला किंमत देणारी. पण आता?
आज एक मित्र, उद्या दुसरा. हे चित्र बदलते आहे.


मैत्री कुणाच्या सांगण्यावरून होत नाही, ती आपोआपच होते. तिला बंधन नसतात. ती स्वच्छंदी, स्वच्छ पाण्यासारखी असते.

मन मोकळं करता येणारी, भावना बोलता येणारी मैत्री – तीच खरी.
मैत्रीत चूक झाली तर एकमेकांना समजून सांगणे, राग न धरता पुन्हा बोलणे, हाच तिचा खरा गोडवा.

आपण घरी न सांगू शकणाऱ्या गोष्टी मित्राला सांगतो.
चांगल्या मित्रांमुळे भविष्य उज्वल होते.
म्हणून संगत चांगली असावी.
मैत्री ही देवाची देणगी आहे.


कोणाला ओळखत नसतानाही, फक्त विचारांमुळे मैत्री होते.
ती फक्त सुखात नव्हे, तर दुःखातही साथ देणारी असावी.

आजची मैत्री मोबाईलपुरती, सोशल मीडियावरची जास्त वाटते. ना भेट, ना संवाद.
पूर्वी एकमेकांच्या घरी जात, गप्पा मारत, मन मोकळं करत.
अडचणी सांगून त्यावर उपाय शोधत.
ती होती खरी मैत्री.


आज पैसे बघून मैत्री होते. मजा मारणं, पार्टी करणे यापुरती मर्यादित.
सर्वजण तसे नाहीत, पण परिस्थिती बघता तसंच वाटतं.

एक मित्र पुढे गेला, तर बाकीचे मागे खेचतात –
हे खेकड्याचं उदाहरण इथे लागू होतं.
अशी मैत्री नसावी.
कोणी यशस्वी झाला तर त्याचे कौतुक करा. पाठ थोपटा.


आज संवाद आभासी झालाय.
प्रेम, जिव्हाळा, गोडशब्द यांचा अभाव आहे.

खरी मैत्री म्हणजे –

“त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडता आले पाहिजे.”
विश्वासाचे नाते टिकले पाहिजे.
दुःख-सुखात साथ दिली पाहिजे.

दिखाऊ मैत्री नसावी.
चढाओढ नसावी.
भावनांची कदर असावी.
विश्वास दृढ असावा.
जीव ओवाळून टाकणारी मैत्री असावी.


अनुभवांची देवाणघेवाण करणारी मैत्री हवी.
सुखदुःख वाटणारी, समजून घेणारी.
मित्र हा वनव्यात गारव्यासारखा असतो.
ज्याच्याकडे जास्त चांगले मित्र असतात, तो खरंच आनंदी असतो –
भलेही त्याच्याकडे संपत्ती नसेल.

गुण-दोषांसहित स्वीकारणारी मैत्री – तीच खरी.

पूर्वी मैत्रिणी एकमेकींच्या घरी जात.
चहा, गप्पा, आनंद.
आता वेळ देणेही अवघड झाले आहे.


मैत्री ही सागरासारखी अथांग असावी.
भरती-ओहोटीसारखी बदलणारी नसावी.
फक्त मोबाईलवर चॅट करणारी नसावी.

प्रत्यक्ष भेटून संवाद साधणारी, दुःख समजणारी हवी.
म्हणूनच शेवटी एकच म्हणता येईल —

"ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे!"

Post a Comment

0 Comments