हार्मनीज इन ह्यूज : रंग, वास्तववाद आणि सर्जनशीलतेचा अद्भुत प्रवास; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार दिपक पाटील यांच्या कलाविश्वाचा वेध


मुंबई | प्रतिनिधी : 

चित्रकला ही केवळ रंगांची मांडणी नसून ती कलाकाराच्या अनुभवांची, संवेदनांची आणि जीवनदृष्टीची अभिव्यक्ती असते. जेव्हा एखादा कलाकार आपल्या साधना, प्रयोगशीलता आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर कलाकृतींना नवा आयाम देतो, तेव्हा त्याची कला रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवते. अशाच प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कलेचा गौरव वाढविणाऱ्या सुप्रसिद्ध चित्रकार श्री. दिपक पाटील यांचे “हार्मनीज इन ह्यूज” हे चित्रप्रदर्शन कला रसिकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरले.


दि. 23 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत मुंबईतील आर्टिस्ट सेंटर, आर्मी अँड  नेव्ही बिल्डिंग, काला घोडा, मुंबई. येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात श्री. पाटील यांनी साकारलेल्या वास्तववादी, जलरंग, मिश्र माध्यम आणि विशेषतः वाळूचा वापर करून तयार केलेल्या कलाकृतींनी कला क्षेत्रातील जाणकारांसह सर्वसामान्य रसिकांनाही अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

श्री. दिपक पाटील हे मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी असून त्यांनी फाईन आर्ट आणि कमर्शियल आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९८ पासून व्यावसायिक कलाक्षेत्रात आपला प्रवास सुरू केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय ॲनिमेशन उद्योगात उल्लेखनीय योगदान दिले. भारतातील पहिल्या पूर्ण लांबीच्या ॲनिमेशन चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘हनुमान’ या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांनी सहभाग नोंदविला. तसेच ‘शेरलॉक होम्स’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी, हिंदी चित्रपट ‘पागलपन’ च्या टायटल ॲनिमेशनसाठी आणि इतर अनेक चित्रपट व मालिकांसाठी त्यांनी 2D आणि 3D ॲनिमेशनमध्ये महत्त्वपूर्ण काम केले.

मुंबईतील सिल्वरटून, क्रेस्ट, इल्युजन यांसारख्या नामांकित ॲनिमेशन स्टुडिओमध्ये त्यांनी कार्य केले. त्यानंतर दिल्लीतील एस्कॉटूनमध्ये ‘किंग’ सारख्या मालिकांवर काम करताना त्यांनी आपली सर्जनशीलता अधिक व्यापक केली. औरंगाबाद येथील जिंगल टूनमध्ये लोकप्रिय बालगीतांच्या निर्मितीतही त्यांनी योगदान दिले. ॲनिमेशन क्षेत्रातील हा समृद्ध अनुभव त्यांच्या चित्रकलेतील बारकावे, रचना, प्रकाशछटा आणि मानवी आकृत्यांमधील प्रमाणबद्धता यामध्ये स्पष्टपणे जाणवतो.

२००७ पासून श्री. पाटील यांनी स्वतःला पूर्णवेळ चित्रकलेसाठी वाहून घेतले. त्यानंतर त्यांनी वास्तववादी चित्रणाला स्वतःची स्वतंत्र शैली दिली. निसर्गचित्रे, मानवी जीवन, ग्रामीण संस्कृती आणि भारतीय परंपरा यांचे त्यांनी अत्यंत प्रभावी आणि भावस्पर्शी चित्रण केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रात केवळ रंगांचे सौंदर्य नसून त्या मागील कथा, भावना आणि जीवनदर्शनही अनुभवायला मिळते.

श्री. पाटील यांच्या कलाविश्वातील सर्वात वेगळा आणि उल्लेखनीय प्रयोग म्हणजे वाळू (Sand Art on Canvas) या माध्यमाचा वापर. चित्रकलेमध्ये वाळूचा वापर करणे हे अत्यंत कठीण मानले जाते. अशा माध्यमात वास्तववादी शैलीतील सूक्ष्म तपशील, पोत, प्रकाशछटा आणि मानवी भावभावना अचूकपणे व्यक्त करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. मात्र अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण साधना, प्रयोगशीलता आणि कलाप्रेमामुळे श्री. पाटील यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे.

राजस्थानच्या वालुकामय भूमीतील लोकजीवन, पारंपरिक वेशभूषा, ऐतिहासिक वास्तू, ग्रामीण संस्कृती आणि त्या प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण वातावरण त्यांनी वाळूच्या माध्यमातून जिवंत केले आहे. त्यामुळे त्यांच्या कलाकृती केवळ चित्र म्हणून न पाहता त्या प्रत्यक्ष अनुभवाव्यात अशा वाटतात. रंगसंगती, सूक्ष्म तपशील, वास्तुशिल्पाचे अचूक चित्रण आणि मानवी आकृत्यांची प्रमाणबद्धता हे त्यांच्या शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

मिश्र माध्यमाइतकेच जलरंग या माध्यमावरही त्यांचे अप्रतिम प्रभुत्व आहे. हिमालयातील निसर्ग, पर्वतरांगा, धुक्याने वेढलेली दऱ्या, नदी-ओढे, मंदिरे आणि आध्यात्मिक वातावरण त्यांनी जलरंगातून अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. जलरंगातील पारदर्शकता, रंगांचे संतुलन आणि प्रकाशछटांचा वापर यामुळे त्यांच्या निसर्गचित्रांना एक वेगळीच जिवंतता प्राप्त होते.

श्री. पाटील यांच्या कलेला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी दाद मिळाली आहे. २०१९ मध्ये ‘ऑलंपिया आर्ट’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ३० देशांतील कलाकारांनी सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेतील Composition & Landscape या विभागात श्री. पाटील यांनी भारतासाठी प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत दुसरा क्रमांक रशियाला मिळाला होता. भारतीय चित्रकलेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते.

याशिवाय २०१४ मध्ये ऑनलाइन स्पॉट लँडस्केप स्पर्धेत वर्षभर चालणाऱ्या मालिकेतील जानेवारी महिन्याचा प्रथम क्रमांकही त्यांच्या लँडस्केप चित्राला मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पुरस्कार, सन्मान आणि गौरव प्राप्त केला असून भारतीय कलेचे प्रतिनिधित्व यशस्वीपणे केले आहे.

चित्रकलेतील त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही. त्यांनी संस्कार भारती आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत अनेक वरिष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली स्पॉट लँडस्केपसारख्या उपक्रमांत काम केले. या अनुभवातून त्यांनी स्वतःची कलाशैली अधिक समृद्ध केली आणि त्याचबरोबर नवोदित कलाकारांनाही मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू ठेवले.

त्यांच्या कार्याची दखल घेत २०२४ पासून देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित कला संस्थांपैकी एक असलेल्या ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या वाईस प्रेसिडेंटपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती त्यांच्या दीर्घकालीन कलासाधनेची आणि नेतृत्वक्षमतेची पावती मानली जाते.

वाईस प्रेसिडेंट म्हणून श्री. पाटील यांच्याकडे संस्थेची कला प्रदर्शने, कार्यशाळा, कलाकार कल्याण योजना, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच भारतीय कलेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा समृद्ध वारसा अधिक बळकट होईल आणि नव्या पिढीतील कलाकारांना अधिक व्यापक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास कला क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत.

“हार्मनीज इन ह्यूज” हे प्रदर्शन केवळ चित्रांचे संकलन नव्हते, तर रंग, निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि मानवी संवेदनांचा एक प्रभावी संवाद होता. वास्तववाद, जलरंग, मिश्र माध्यम आणि वाळूसारख्या अनोख्या माध्यमातून श्री. दिपक पाटील यांनी भारतीय चित्रकलेला एक नवा आयाम दिला आहे.

आजच्या आधुनिक आणि वेगवान युगात भारतीय परंपरा, निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा जपणारे कलाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. श्री. दिपक पाटील यांची कलासाधना ही त्याचेच उत्कृष्ट उदाहरण आहे. भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय असून त्यांच्या आगामी कलाप्रवासाकडून कला रसिकांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.







Post a Comment

0 Comments