मुंबई | प्रतिनिधी :
NEET पेपर लीक आणि शिक्षण क्षेत्रातील कथित घोटाळ्यांमुळे देशभर संतापाची लाट उसळली असताना जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोकराव आल्हाट यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत “हा फक्त पेपर लीकचा विषय नाही, तर लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून आहे,” असे म्हटले आहे.
मा. अशोकराव आल्हाट म्हणाले की, “महाराष्ट्रातील लाखो गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या आशेने शिक्षण घेतात. आई-वडील स्वतःची जमीन गहाण ठेवतात, दागिने विकतात, कर्ज काढतात आणि आपल्या मुलाला डॉक्टर, इंजिनिअर किंवा अधिकारी बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण काही तथाकथित शिक्षण सम्राटांनी या भावनांचाच व्यापार सुरू केला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “लातूर पॅटर्न हे एकेकाळी महाराष्ट्राच्या गुणवत्तेचे प्रतीक होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी संघर्ष करून मेरिटमध्ये येत होते. मात्र काही लोकांनी शिक्षण क्षेत्रालाच बाजार बनवून टाकले.” त्यांनी आरोप केला की, “ज्ञान देणाऱ्या हातांनी जर पैशासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू केला, तर ही समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.”
मा. आल्हाट यांनी शिक्षण संस्थांच्या वाढत्या आर्थिक साम्राज्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “एका शिक्षकाकडे किंवा कोचिंग क्लास मालकाकडे हजारो कोटींची संपत्ती येते कुठून? हा पैसा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घामाचा आणि गरीबांच्या कष्टाचा आहे.” त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
ते म्हणाले की, “आज मेहनतीने अभ्यास करणारा विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतो, पण दुसरीकडे पैशाच्या जोरावर पेपर फुटत असतील, सेटिंग होत असेल आणि मार्केटिंग करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असेल, तर ही देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.”
मा. आल्हाट यांनी सरकार आणि तपास यंत्रणांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “जर इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असतील, तर प्रशासन आणि तपास यंत्रणा नेमक्या काय करत होत्या? शिक्षण क्षेत्रात इतका मोठा काळाबाजार सुरू असताना कोणाचे संरक्षण मिळत होते?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “हा फक्त एका व्यक्तीचा विषय नाही. शिक्षण क्षेत्रात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची भावना आता जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्था, आर्थिक व्यवहार, दलाल आणि राजकीय संरक्षण या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
मा. आल्हाट यांनी स्पष्ट केले की, “शिक्षण ही समाजाची पवित्र व्यवस्था आहे. पण काही लोकांनी तिला पैशाचा व्यवसाय बनवले आहे. डॉक्टर, इंजिनिअर आणि अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
ते म्हणाले की, “आज सामान्य पालकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करूनही जर यश पैशाने विकत घेतले जाणार असेल, तर गरीब विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा?” त्यांनी शिक्षण क्षेत्राचे तातडीने शुद्धीकरण करण्याची मागणी केली.
मा. आल्हाट यांनी पुढे इशारा देत म्हटले की, “जर शिक्षण व्यवस्थेतील एज्युकेशन माफियांवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात समाजात मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवरील विश्वास संपुष्टात येईल.” त्यांनी या प्रकरणातील सर्व बडे मासे, राजकीय संरक्षण देणारे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, “जनहित लोकशाही पार्टी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या बाजूने ठामपणे उभी आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.”
एकंदरीत, NEET आणि शिक्षण क्षेत्रातील कथित घोटाळ्यांमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, मा. अशोकराव आल्हाट यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिक्षण माफियांविरोधातील संताप अधिक तीव्र होताना दिसत आहे.


0 Comments