महाराष्ट्र दिन - अस्मितेचा हुंकार आणि कर्तव्याची जाणीव


नाशिक १ मे : आज महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी मराठी माणसाने दिलेला हा लढा केवळ भौगोलिक नव्हता, तो होता भाषिक व सांस्कृतिक अस्मितेचा.


सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या राज्याने देशाला काय दिले नाही? ज्ञानेश्वर-तुकारामांच्या अभंगातून विश्वबंधुत्वाचा संदेश, शिवछत्रपतींच्या पराक्रमातून स्वराज्याची प्रेरणा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांतून शिक्षणक्रांती, राजर्षी शाहूंच्या कार्यातून सामाजिक समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आधुनिक भारताचे भवितव्य.


लोकमान्य टिळकांची 'स्वराज्य' गर्जना असो वा यशवंतराव चव्हाणांनी घडवलेला आधुनिक महाराष्ट्र - प्रत्येक टप्प्यावर या राज्याने देशाला दिशा दिली. आज उद्योग, माहिती तंत्रज्ञान, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर आहे.


मात्र १ मे हा केवळ उत्सवाचा दिवस नाही. हा आत्मचिंतनाचा दिवस आहे. ज्या स्वप्नांसाठी हुतात्म्यांनी प्राणार्पण केले, तो समृद्ध, पुरोगामी आणि न्याय्य महाराष्ट्र आपण घडवत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वाढती विषमता ही आव्हाने आजही कायम आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशे वाजवताना या प्रश्नांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. जातीपातीच्या भिंती आणि द्वेषाचे राजकारण बाजूला सारून ज्ञान-विज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती हेच खरे हुतात्म्यांना अभिवादन ठरेल.


महाराष्ट्र घडवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. तो प्रत्येक नागरिकाच्या कृतीतून, विचारातून साकार होत असतो. या महाराष्ट्र दिनी रयतेचे राज्य, समतेचा विचार आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प करूया. कारण हा महाराष्ट्र आपल्याला लढून मिळाला आहे.


*जय महाराष्ट्र!* सौ . श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न.

Post a Comment

0 Comments