कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड होऊ देणार नाही ! प्रदेक्षाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा



नाशिक | प्रतिनिधी :

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (प.) ॲड. शंकर चव्हाण यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, “कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. पर्यावरणाचा बळी देणारा विकास मान्य नसून, वृक्षतोड तात्काळ थांबवली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “कुंभमेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा विषय आहे. मात्र या पवित्र सोहळ्याच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जात असतील, तर तो विकास नसून विनाश आहे.” त्यांनी सांगितले की, नाशिक परिसरात ३०० ते ५०० वर्षे जुनी झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

ते पुढे म्हणाले की, “ही झाडे केवळ निसर्गाचा भाग नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अविभाज्य घटक आहेत. अनेक साधू-संतांनी शेकडो वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे आजही पर्यावरणाचे संतुलन राखत आहेत. अशा झाडांची कत्तल करणे म्हणजे आपल्या वारशावरच घाव घालणे आहे.”

ॲड. चव्हाण यांनी राज्य सरकारच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “कुंभमेळ्यासारखा मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना पर्यावरणपूरक नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र सध्या जे निर्णय घेतले जात आहेत, ते निसर्गविरोधी आहेत. सरकारने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करण्याचा मार्ग स्वीकारला आहे, हे दुर्दैवी आहे.”

“विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती आणि सुविधा नव्हे, तर पर्यावरणाचे संरक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी इशारा देत म्हटले की, “जर वृक्षतोड तात्काळ थांबवली नाही, तर जनहित लोकशाही पार्टी राज्यभर आंदोलन उभारेल. पर्यावरणाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

ॲड. शंकर चव्हाण यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, “ही लढाई केवळ एका पक्षाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. आपल्या भविष्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण वाचवणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी युवकांना या विषयावर पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या प्रकरणामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पर्यावरण आणि विकास यामधील संतुलन कसे राखले जाणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांकडूनही वृक्षतोडीला विरोध होत असल्याचे चित्र आहे.

ॲड. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, “धार्मिक कार्यक्रम हे समाजाला एकत्र आणण्यासाठी असतात, पण त्यासाठी निसर्गाचा बळी देणे योग्य नाही. श्रद्धा आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे.” त्यांनी सरकारला आवाहन केले की, तात्काळ या निर्णयाचा पुनर्विचार करून पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात.

एकंदरीत, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या तयारीदरम्यान पर्यावरणाचा विचार न करता वृक्षतोड करणे ही गंभीर बाब असून, ॲड. शंकर चव्हाण यांनी घेतलेली भूमिका ही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments