सेवायोग फाउंडेशनच्या पुढाकाराने अ. ग. वाडी केंद्र रावगाव शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर किट वाटप — सामाजिक बांधिलकीची सुंदर प्रचिती



हडपसर, पुणे / करमाळा (प्रतिनिधी) :
समाजातील विद्यमान परिस्थितीत शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक आणि मुलांचे भविष्य घडविण्याचा खरा मार्ग आहे. याच जाणिवेतून सेवायोग फाउंडेशन, हडपसर पुणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ. ग. वाडी केंद्र रावगाव, तालुका करमाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. श्री रामचंद्र वसंतराव जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमात अ. ग. वाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रतीचे दप्तर किट देण्यात आले. या किटमध्ये दप्तर, सहा वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल, पट्टी, पायमोजे, तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोपी यांचा समावेश होता. शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज ओळखून त्याला योग्य वेळी हातभार लावल्यामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना होती.

अ. ग. वाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री प्रवीण बिनवडे यांनी सेवायोग फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे. सेवायोग फाउंडेशनने ही जबाबदारी ओळखून शाळेतील मुलांना दिलेला हा आधार नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.” तसेच त्यांनी या उपक्रमामुळे वाडीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष फुंदे सर यांनी शाळेला केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल सेवायोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान केला. त्यांनी सांगितले की, “शिक्षण हा केवळ शाळा आणि शिक्षकांचा विषय नाही, तर संपूर्ण समाजाने मिळून घडवायचा संस्कार आहे. आज सेवायोग फाउंडेशनने या उपक्रमातून समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे.”

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत फाउंडेशनमधील सर्व सदस्य तसेच गावकऱ्यांचा मोलाचा सहभाग होता. शेवटी श्री राजेंद्र बोकेफोडे सर यांनी सेवायोग फाउंडेशनचे सदस्य, गावातील नागरिक आणि शाळेच्या शिक्षकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, “आज दिलेले दप्तर आणि साहित्य ही केवळ वस्तू नाहीत, तर मुलांच्या स्वप्नांना पंख देणारी ऊर्जा आहे.”

या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. त्यांचे चमकणारे डोळे आणि हसरे चेहरे हीच सेवायोग फाउंडेशनच्या कार्याची खरी पावती ठरली.

सेवायोग फाउंडेशनने पुन्हा एकदा सिद्ध केले की माणुसकी, शिक्षण आणि सेवा या तीन गोष्टींपेक्षा मोठा धर्म कोणताही नाही. समाजात असे उपक्रम सातत्याने राबवले गेले तर भविष्यातील पिढी अधिक सक्षम, स्वावलंबी आणि जाणते नागरिक म्हणून घडेल यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments