राज्यात हादरवून सोडणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एक हुशार आणि कर्तृत्ववान तरुणीने अन्याय, मानसिक छळ आणि सत्तेच्या दडपशाहीला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरील मोठा कलंक आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे स्पष्टपणे उघड झाल्यानंतरही अद्याप मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा फरार आहे, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर पोलिस कोठडीत आहे. परंतु, चौकशीतील ढिलाई आणि पोलिसांचा विलंबित प्रतिसाद हे गंभीर संशय निर्माण करणारे आहे. जर एखादा सामान्य नागरिक असता, तर काही तासांत कारवाई झाली असती. मात्र, जेव्हा प्रकरणात राजकीय छाया दिसतात, तेव्हा पोलीस यंत्रणा शांत का होते, हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो आहे. या संदर्भात अॅड. शंकर चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू ही आत्महत्या नसून, सत्ताधाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या प्रणालीतील अपयशाचे परिणाम आहे. एका महिला डॉक्टरवर होत असलेला छळ आणि दबाव हे समाजाच्या अंतरात्म्याला हादरवून सोडणारे आहे. यामध्ये थेट खासदाराचे नाव पुढे येत असताना सुद्धा पोलीस कारवाई करण्यास घाबरत आहेत, हे लोकशाहीला काळा दिवस आहे.”अॅड. चव्हाण यांनी पुढे म्हटले की, “या प्रकरणात केवळ आरोपीच नव्हे तर पोलिस यंत्रणेत ज्यांनी दुर्लक्ष केले, त्यांनीही जबाबदारी घ्यावी. गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची जबाबदारी घेत आरोपींना अटक करून जलदगतीने न्याय दिला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रभर कायदा आणि न्याय यावरील विश्वास उरलेला राहणार नाही.”मुंडे कुटुंबावर आलेले दुःख आणि अन्याय संपूर्ण समाजासाठी वेदनादायी आहे. डॉक्टर संपदाने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर आरोपींची नावे लिहून समाजाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या विवेकाला प्रश्न विचारला आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये, यासाठी राज्यातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने या प्रकरणात आवाज उठवणे आवश्यक आहे. अॅड. शंकर चव्हाण यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही, तर ते स्वतः पुढाकार घेऊन राज्यभर आंदोलन उभारतील. “एक महिला डॉक्टरचा आवाज गप्प केला गेला आहे, पण आम्ही शांत बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील,” असे ते म्हणाले. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूने केवळ वैद्यकीय जगत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता लोकांची अपेक्षा एकच — दोषींना कठोर शिक्षा आणि प्रणालीतील दोषींवर तात्काळ कारवाई. अन्यथा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास ढासळेल आणि समाजात भीतीचे वातावरण कायम राहील.
*****


0 Comments