रहाटाचं गाडं

रहाटाचं गाडं


नको माहेरची साडी 

नको सौभाग्याचं लेणं

बाबा तुझ्याच अंगणी

मला शिंपू दे चांदणं


नको दुरावा तुमचा 

नको हुरहुर ती हुंड्याची

आई तुझी हि होऊ दे

ताई लाडकी दादाची


बाबा तुझ्याच मिठीत 

जरा विसावू दे मला

परक्याचं धन म्हणून 

नको हेलावुस मला


लेक सौख्याच औक्षण 

लेक माहेरचं लेणं

का रे माळतोस माथी

चूल मुलाचं खेळणं


दानाहून महादान

कन्यादान कर बाबा

तुकडा तुझ्या काळजाचा

तोडून दे रे कुणा बाबा


डोळा तुझ्या सुद्धा पाणी

ओठी पाठवणीची गाणी

बाबा होशील पोरका 

तुझ्या घरी माझ्या वाणी


लेक परक्याचं धन 

चल कर कन्यादान

जग रहाटाचं गाडं

नाव ठेवील घबाडं

 

बाबा तुझ्याच रे साठी 

दूर तुझ्याहून जाते 

डोळा घेऊनिया पाणी

गीत आनंदाचे गाते 

गीत आनंदाचे गाते......

- सोनाली योगेश पाटील, सुरत

sonalihanumantkarande@gmail.com


Post a Comment

0 Comments