स्मशानभूमीसाठी मृतदेहासह लिंगायत समाजाचं ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे



 अंबाजोगाई (वार्ताहर)

येथील लिंगायत समाजाने अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या मागणीसाठी सातत्याने प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, त्यांच्या या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर समाजबांधवांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत मृतदेहासह अंबाजोगाई नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. समाजातील गणपतआप्पा वाघमारे यांचे काल रात्री निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावर तोडगा निघेपर्यंत मृतदेहासह आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

लिंगायत समाजामध्ये मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे. पूर्वी या समाजासाठी जे ठिकाण निर्धारित करण्यात आले होते, त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते. उत्खननादरम्यान बाराखांबी परिसरात अनेक पुरातन मूर्ती सापडल्या होत्या. परिणामी, केंद्र सरकारने या जागेचा ताबा घेतला आणि तिथे दफनविधी करण्यास मनाई केली. त्यामुळे समाजासमोर नवा प्रश्न उभा राहिला – अंत्यसंस्कारासाठी योग्य जागेचा अभाव.

मागील काही वर्षांपासून लिंगायत समाजाने जिल्हा अधीक्षक, तहसीलदार, उपनिबंधक, तसेच नगरपालिका यांना निवेदने देत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, जेव्हा नव्याने मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला तेव्हा पूर्वीचे अवशेष आढळले, ज्यामुळे अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. ही स्थिती अत्यंत वेदनादायक असून, समाजाच्या धार्मिक आणि भावनिक भावना देखील दुखावल्या गेल्या.

या पार्श्वभूमीवर गणपतआप्पा वाघमारे यांचे पार्थिव नगरपालिकेच्या दारात ठेवून समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. आंदोलन शांततामय स्वरूपाचं असलं तरी त्यामागील वेदना आणि असहायता स्पष्ट दिसून येत होती. "आम्हाला आमच्या धर्मपरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा हवी आहे, आम्ही कोणाची जमीन बळकावत नाही, केवळ न्याय मागत आहोत," असा सूर आंदोलनात उमटत होता.

अखेर माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी पुढाकार घेऊन सीईओ साहेबांशी संवाद साधला. यानंतर प्रशासनाच्या वतीने समाजाच्या मागणीची दखल घेण्याचं आणि तातडीने योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलं. यावर समाजबांधवांनी आंदोलन मागे घेतलं.

ही घटना प्रशासनासाठी एक मोठा इशारा ठरली आहे. धर्म, परंपरा, आणि मानवी हक्क यांचा आदर राखून त्वरित योग्य तो निर्णय घेणे ही वेळेची गरज आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटनांनी समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

Post a Comment

0 Comments