पंढरपूर, प्रतिनिधी –
वारी ही केवळ अध्यात्मिक यात्रा नसून, ती सामाजिक परिवर्तनाची गंगा आहे. यंदाच्या वारीत "समता, संविधान" दिंडीच्या माध्यमातून समाजाला एक नवा विचार देण्याचे कार्य सुरू आहे. याच अनमोल विचारांचा वारसा घेऊन ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडीचे प्रमुख सूत्र आहे – समता, बंधुता आणि संविधानाचे रक्षण.
या अनोख्या उपक्रमास वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष अनंत महाराज कांडके कौडगांवकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्व आहे. यामुळेच आज सर्व भारतीयांना समान हक्क प्राप्त झाले आहेत. देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा, जगण्याचा आणि न्याय मिळवण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळाला आहे."
संत परंपरेचा दाखला देत अनंत महाराज म्हणाले, “संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत सावता महाराज, संत एकनाथ, संत चोखोबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत नरहरी महाराज बाबा, संत गोरोबा काका आदी संतांनी कायमच समतेचा, बंधुत्वाचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आहे. वारी ही याच विचारांची प्रेरणा आहे.”
ही दिंडी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करत असून, वारकरी संप्रदायातील अनेक श्रद्धावान मंडळी यामध्ये सहभागी होत आहेत. गायनाचार्य वैजनाथ महाराज पांचाळ (गोपीनाथगड), उत्तम महाराज बोडके कौडगांवकर, मृदंगाचार्य भीष्म सुरेश महाराज पाथरिकर आणि इतर वारकरी बंधू या दिंडीमध्ये सहभागी असून भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण करत आहेत.
समाजात सौहार्द आणि समतेचा विचार रुजवण्यासाठी ही दिंडी एक प्रभावी माध्यम ठरत असून पंढरपूर वारीच्या माध्यमातून हे विचार लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत.
"समता, संविधान आणि अध्यात्म" या त्रिसूत्रीचा प्रचार करणारी ही दिंडी म्हणजे काळाची खरी गरज आहे," असे मत अनंत महाराज कांडके यांनी व्यक्त करत सर्व वारकऱ्यांना या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन केले.


0 Comments