व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण पिढी.



26 जून हा व्यसनाच्या विरोधी आणि अमली पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आपण आजूबाजूला बघतो तरुण पिढी किती व्यसनांच्या आहारी गेलेली आहे. ठीक ठिकाणी टोळके करून गांजा, अल्कोहोल, ड्रग्स, इंजेक्शन असे बरेच व्यसन तरुण पिढीला दिसते. 

तरुण पिढी ही हुशार व्हावी, ताकतीने बलशाली व्हावी, विचारवंत असावी असे वाटते परंतु चित्र मात्र वेगळेच दिसते. ही सर्व पिढी उद्याचे भविष्य आहे ती योग्य मार्गाने जायला हवी असे वाटते. परंतु इतक्या व्यसनांच्या आहारी गेलेली पिढी ही कशी काय उद्याचे देशाचे भविष्य सांभाळू शकते.
तरुण पिढीला आज काल हातामध्ये मोबाईल, इंटरनेट, ओ टी टी असे अनेक प्रकार त्यांना वापरायला मिळत आहे. 
आजकालची पिढी ही विचार न करता कुणाचेही मार्गदर्शन न घेता वागत आहे. 
पूर्वी तसे नव्हते संस्कार हे आई वडील ,आजी-आजोबा घरातूनच केले जायचे परंतु आता मात्र कुठेतरी संस्कार हे कमी पडता आहेत असे वाटते. 
अनेक विद्यार्थी हे शहरात येतात काहीजण परदेशात जातात आई वडील त्यांच्या जवळ नसतात. त्यामुळे आपले पाल्य नक्की काय करते आहे हे आई-वडिलांना लांबून कसे समजणार. आणि कोणी लक्ष द्यायला नसल्यावर सगळे वातावरण त्यांना मोकळे मिळते. पुन्हा सोबत असणारे मित्र मैत्रिणी साथ द्यायला असतात. संगत जशी असेल तसेच त्याप्रमाणे आपले पाल्य घडत जाते असे वाटते. आणि पालक पोटाला चिमटा घेऊन भरपूर पैसे मुलांना पाठवतात त्या पैशांचे आपले मुलं सदुपयोग करतात की दुरुपयोग करतात हे कोणालाही सांगता येत नाही. आणि जवळ एवढे पैसे असल्यावर व्यसनांच्या आहारी जाणे सहाजिकच आहे. 
मी म्हणत नाही की सर्व मुलं मुले व्यसनी आहेत परंतु जास्त प्रमाण मात्र हे व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या पिढीचे दिसत आहे. 
मुलांना कोण मग मार्गदर्शन करणारा हा प्रश्न समोर उभा राहतो. 
आता व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण पिढी यांना परत योग्य मार्गावर कसे आणावे हा प्रश्न पालकांपुढे राहतो. 
पालक, शिकवणारे शिक्षक, आणि समाज हे सगळेजण आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलायचे काम करतात. मुलांना योग्य वेळी जर मार्गदर्शन केले गेले तर काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यांना समजेल परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. 
पाल्य पालकांकडे पैसे मागतात आणि वेगवेगळे कारण सांगतात आणि पालकही फारसे त्यांच्या खर्चाकडे लक्ष देत नाही वेळोवेळी मात्र भरपूर पैसे देत असतात. काही पाल्य स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी नोकरी करतात आणि पैसे कमवतात आणि व्यसनांच्या आहारी सुद्धा जातात.
कित्येक पाल्य हे स्वतःच्या दुनियेमध्ये रममान असतात खाणे पिणे, मजा करणे एवढेच त्यांचे फक्त आयुष्य असते. आपण शिक्षणासाठी बाहेर आलेलो आहोत करिअर करण्यासाठी आलेलो आहोत याचा त्यांना विसर पडतो असे वाटते.
महाराष्ट्रातील आकडेवारी ही धोक्याची घंटा आहे. देशातील 14.6% लोक अल्कोहोलचे सेवन करताना दिसतात. 
व्यसन ही तरुण पिढी का करताना दिसते तर याची कारणे सामाजिक आणि मानसिक असू शकतात. 
कुटुंबामध्ये एकमेकांशी संवाद नसणं. 
स्पर्धा परीक्षांचे टेन्शन घेणे. 
झटपट श्रीमंत होण्यासाठी सहजतेने पैसे कुठून मिळवता येते याचा मार्ग अवलंबने.
स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही. 
स्वतः फिट दिसण्यासाठी वेगवेगळ्या इंजेक्शनचा वापर करणं. 
यावर कोणते उपाय करता येतील हे आपण बघू. 
पालक आणि पाल्य यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. आज-काल आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे मुलांना वेळ कोण देईल हा एक प्रश्न असतो. सुट्टी असल्यावर तरी आपल्या मुलाबरोबर मुली बरोबर आपण सुसंवाद साधायला हवा असे वाटते. 
शाळांमधूनही अमली पदार्थांमुळे शरीरावर काय विपरीत परिणाम होतात हे शिकवावे. 
यासाठी कठोर कायदे व्हायला हवे असे वाटते. अंतर्गत कायदे, समुपदेशन केंद्रे चालू करावेत असे वाटते. 
समाजातील सर्व स्तरातून यासाठी काही उपाययोजना करता येतील का? तेही बघावे. 
मी रस्त्याने जात असताना एक मुलगी म्हणाली तिचे पूर्ण केस केलेले होते मी तिला थांबून विचारले तुझे वय काहीच नाही तर तुझे केस कसे गेले. यावर ते मला पटकन उत्तर दिले नाही पण नंतर मात्र तिने सांगितले ताई मला ड्रग्स घेण्याची सवय होती. म्हणून माझे केस गेलेले आहेत आणि स्वभाव सुद्धा माझा बदललेला आहे. 
आत्ताच्या तरुण पिढीला याचे गंभीर परिणाम माहिती असून सुद्धा ही पिढी व्यसनाच्या आहारी का जाते हा मोठा प्रश्न समाजासमोर आहे. 
खड्डा दिसतो आहे आणि त्यात आपण उडी मारायची तर घाण आपल्या अंगावर उडणारच हे कळून सुद्धा तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाते याचे मोठे नवल वाटते. 
यातून बाहेर काढण्यासाठी पालक, समाज, आणि कठोर कायदे यांची नितांत गरज आहे असे वाटते. 
वेळीच सावरले तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही आणि देशाचे भविष्य देखील सुरक्षित राहील तरुण पिढी देशाचे भविष्य आहे या भविष्याला कसे रुळावर आणायचे हे मात्र आता तातडीने बघण्याची गरज आहे असे वाटते. 
- श्रुती पवार. (महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार २०२५ प्राप्त) 

Post a Comment

0 Comments