ॲड. सचिन शिवाजीराव देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरीक्त न्यायाधीशपदी नियुक्ती ; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - ॲड. शंकर चव्हाण





ॲड. सचिन शिवाजीराव देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरीक्त  न्यायाधीशपदी नियुक्ती ; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - ॲड. शंकर चव्हाण 

 » मुंबई  | प्रतिनिधी : 

बीड जिल्ह्याचे सुपुत्र ॲड. सचिन देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरीक्त न्यायाधीश पदी नियुक्ती झाली असून, या नियुक्तीने केवळ बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे, असे ॲड. शंकर चव्हाण (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय) यांनी ट्विट करत गौरवोद्गार मांडले.

आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं आहे की, "न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि लोकाभिमुख न्यायप्रक्रियेच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर बीडमधून आलेल्या आणि प्रामाणिकतेने न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपद मिळणं हे समाजासाठी प्रेरणादायी आहे."

केंद्र सरकारने सोमवारी ॲड. सचिन देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती केली. ॲड. सचिन देशमुख हे औरंगाबाद खंडपीठातून नियुक्त झालेल्या २५ वे न्यायाधीश आहेत. मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील पोहनेर गावचे रहिवासी असलेले ते गेल्या २४ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होते. 

परळी वैजनाथ हे ठिकाण केवळ धार्मिक व सांस्कृतिक परंपरेपुरते मर्यादित न राहता, न्यायसंस्थेसाठीही एक समृद्ध भूमी ठरले आहे. न्यायमूर्ती जगदीश दळवी, आर.एस तोतला, आनंद मुंडे यांच्यासारखे अनेक नामवंत न्यायाधीश आणि अधिकारी परळी वैजनाथ व अंबाजोगाईसारख्या ठिकाणांमधून महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला लाभले आहेत. यामुळे बीड जिल्हा, विशेषतः परळी, ही ‘न्यायाधीशांची खाण’ म्हणून ओळखली जावी इतकी उल्लेखनीय न्यायिक प्रतिभा इथून पुढे आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांमध्ये बीड जिल्ह्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अलीकडच्या काळात, काही अपवादात्मक राजकीय हस्तक्षेप आणि निर्णयांमुळे परळीसह बीड जिल्ह्याच्या प्रतिमेला काहीसे गालबोट लागले आहे. पण हे विसरता कामा नये की, बीड जिल्ह्याचा मूलभूत स्वभाव हा प्रगतीशील, बुद्धिनिष्ठ आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असा आहे. येथे केवळ प्रशासकीय अधिकारी किंवा न्यायाधीशच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात तळमळीने कार्य करणारी माणसं आहेत. त्यामुळे समाजमनात नव्याने आत्मविश्वास निर्माण करून बीडच्या या गौरवशाली वारशाला पुन्हा एकदा उजाळा देणं, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ॲड. सचिन देशमुख सरांची उच्च न्यायालयातील नेमणूक हीच त्या उजळलेल्या वारशाची प्रचीती आहे – की बीड जिल्हा केवळ इतिहासात नव्हे, तर वर्तमानातही महाराष्ट्राचं मानाचं स्थान आहे.

मुंबई उच्च न्यायालयात बीड जिल्ह्याचे सुपुत्र न्यायमूर्ती सचिन देशमुख यांची अतिरीक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. ही केवळ एक वैयक्तिक उपलब्धी न राहता, संपूर्ण मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्याच्या न्यायिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या या नेमणुकीने बीडच्या न्याय क्षेत्राला एक नवा आयाम प्राप्त झाला असून, या नेमणुकीचा गौरव साऱ्या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेल्या एका खऱ्या अर्थाने निष्ठावान आणि प्रामाणिक न्यायिक अधिकाऱ्याला उच्च न्यायालयात संधी मिळणं, ही एक लोकशाही मूल्यांना आणि कष्टाच्या मार्गाने चालणाऱ्या तरुणांना दिलेली मोठी आशा आहे.

बीड जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असून, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र अनेक वेळा इथल्या तरुणांना न्यायव्यवस्थेसारख्या शिस्तबद्ध आणि दर्जेदार क्षेत्रात स्थान मिळताना अडचणी येतात. शिक्षण, संधी आणि आर्थिक मर्यादा यामुळे त्यांच्यासाठी हा मार्ग अधिक कठीण असतो. मात्र ॲड.सचिन देशमुख यांनी हे सिध्द केले की, कठोर परिश्रम, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर कोणतीही सीमा मोडता येते. त्यांनी आपल्या संघर्षातून आणि कर्तृत्वातून ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांना एक नवा आदर्श दिला आहे. यामुळेच त्यांच्या नियुक्तीचा आनंद केवळ त्यांच्या परिवारापुरता सीमित राहत नाही, तर तो संपूर्ण जिल्ह्याच्या लोकांमध्ये उमटतो.

सध्याच्या काळात न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाला बळ देणारी ठोस पावले उचलण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते आहे. अशा वेळी ॲड. सचिन देशमुख यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची उच्च न्यायालयात नियुक्ती होणं म्हणजे संपूर्ण व्यवस्थेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. त्यांच्या भूमिकेतून न्यायव्यवस्थेच्या    सक्षमीकरणाला चालना मिळेल, आणि ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. वकील  म्हणून माझं स्पष्ट मत आहे की, अशा न्यायमूर्तींची संख्या वाढणं हे न्यायालयांवरील जनतेचा विश्वास दृढ करणारे ठरतं.

मी स्वतः एक ग्रामीण भागातून आलेला वकील असून, अशा यशस्वी वाटचालीकडे पाहताना आत्मिक समाधान वाटतं. न्यायमूर्ती सचिन देशमुख सरांची नेमणूक मला आणि माझ्यासारख्या अनेक वकिलांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या वाटचालीतून मिळणारा संदेश स्पष्ट आहे—जिथे प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सेवा वृत्ती असेल तिथे यश अटळ असतं. ही नियुक्ती न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारी आहे.

ॲड. सचिन देशमुख सरांच्या कार्यशैलीत एक सामाजिक भान, सहवेदना आणि सच्ची बांधिलकी सदैव दिसून आली आहे. त्यांच्या निर्णयात समाजातील दुर्बल घटकांसाठी एक संवेदनशील दृष्टिकोन असतो. हे गुण उच्च न्यायालयात न्यायदान करताना निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. त्यांच्या नियुक्तीने फक्त बीड जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला एक आदर्श न्यायाधीश लाभले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आणि न्यायासाठी दाखवलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या ऐतिहासिक क्षणी, बीड जिल्ह्यातील सर्व वकिल बांधव, न्यायप्रेमी नागरिक, आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या वतीने मी, ॲड.शंकर चव्हाण, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांची न्यायिक वाटचाल निष्पक्ष, न्यायपूर्ण आणि समाजहितासाठी उपयुक्त ठरेल, याचा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. त्यांच्या योगदानामुळे मराठवाड्यातील न्याय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे.

आजच्या या अभिमानास्पद क्षणी, आपण सर्वांनी एक संकल्प करायला हवा—आपल्या-आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याचा, आणि अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून शिकत आपल्या समाजाला, जिल्ह्याला आणि देशाला न्याय, शिक्षण व प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचा. ॲड. सचिन देशमुख सरांच्या यशाने हे निश्चित केले आहे की, खऱ्या प्रयत्नांमुळे कोणतीही स्वप्नं अशक्य नाहीत.

"ॲड.देशमुख सरांची ही नेमणूक लाखो ग्रामीण तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. जिथे इच्छाशक्ती, नैतिकता आणि शिक्षण असतं तिथे यश अटळ असतं," असे ॲड.चव्हाण म्हणाले.

"आज देशाला अशा न्यायाधीशांची गरज आहे, जे कायद्याच्या चौकटीत राहून समाजाच्या शेवटच्या घटकासाठीही न्याय मिळवून देतील. ॲड. सचिन देशमुख सरांचं योगदान निश्चितच मोलाचं ठरेल," अशी अपेक्षा व्यक्त करत ॲड. चव्हाण यांनी संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने ॲड. सचिन देशमुख सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments