राष्ट्रनिर्मितीची मशाल : राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर
''राष्ट्रनिर्माणाचा वसा घेऊनि
लढल्या न्यायासाठी आहिल्याराणी ।
धन्य धन्य त्या वीरांगना
करुया त्यांना मानवंदना
करुया त्यांना मानवंदना ।। ''
सुकीर्तीमान लोकमाता, राष्ट्रमाता ज्यांनी घोंगडीवर बसून तडफ,असामान्य तेज,आत्मविश्र्वास,प्रगल्भ बुध्दिमत्ता,जिद्द,धाडस, स्वाभिमान,मुत्सद्दीपणा, हजरजबाबीपणा अशा अनेक अंगीभूत गुणांदवारे राज्यकारभार पाहुन न्यायासाठी अखंड लढा दिला
त्या महाराणी आहिल्यामाईस विनम्र अभिवादन .........!
आहिल्यामाईंचा जन्म 31 मे 1725 सालचा.वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी ज्यांच्या माथ्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली असतानासुध्दा न डगमगता संबंध आयुष्य सुरळीतपणे यशस्वी राज्यकारभार चालवणाऱ्या या खंडेरावांच्या सहधर्मी, सहयोगी, सहकर्मी, मैत्रीण व आज्ञाधारक पत्नीच नव्हे तर अगदी त्यांची प्रेरणासुध्दा ! सुभेदार मल्हारराव होळकर यांनी तहानलेल्या अवस्थेत पाणी मागितले असताना तहानलेल्यांना पाणी पाजण्या अगोदर दोन घास खाऊ घालणे हा आमचा धर्म हे आहिल्याबाईचे बालवयातील अपेक्षेपलीकडेच उत्तर आणि आहिल्यामाईंच्या अशा अनेक गुणामुळे शुरवीर खंडेरावांच्या पत्नी व मल्हारराव होळकरांच्या सून झाल्या. त्यांच्या अंगी असलेल्या चतुर, शांत, संयमी, ज्ञानी, विनयशील, क्षमाशील, सुशील, प्रेमळ अशा अनेक स्वभावगुणधर्मामुळे विवाहानंतर त्यांनी घरातील सर्वांची मने जिंकून घेतली. अशा तेजस्वी आहिल्यामाईंनी राज्यकारभार किती तत्परतेने सांभाळुन राष्ट्रनिर्मिती भरभक्कम केली असेल हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच काय ? बाई मेली तर पुरुष जाणार नाही सती. पंधराव्या दिवशी तो बोहल्यावर चढेल तर मग कसला हा तुमचा सती जाण्याचा धर्म ? ही तर केवळ तुमची अंधश्रध्दा ! अशी स्पष्टोक्ती करुन आहिल्यामाईंनी सतीप्रथेस प्रचंड विरोध केला.
दलित, पीडीत, दु:खी व रंजल्या गांजल्यांच्या जखमेवर आहिल्यामाईंच्या राज्यात अस्पृश्यता व जातीभेद ही कोसो दुरची गोष्ट. त्यांच्या अशा समानतेच्या विचारामुळे मोघल, निजाम, टिपु, यासारख्या मुस्लिम राज्यातील मुस्लिम व इतर प्रजादेखील आहिल्यामाईंच्या राज्यात राहण्यास उत्सुक असत. त्यांच्या इतिहासातील पुढील प्रसंग त्यांच्या पराक्रमाबद्दल सांगुन जातो तो म्हणजे गंगाधरपंत व राघोबा यांनी षडयंत्र रचून राज्य हिरावून घेण्यांचा बेत आखला असताना मल्हाररावांच्या संबंधांना व ऋणाला जागून अनेक शेजारी राजांनी मदतीसाठी धावून आलेत त्या लढयात राघोबा व गंगाधरपंत यांचा कुटिल डाव आहिल्यामाईंनी उधळून लावला त्या शत्रूंना तलवार चालण्यापुर्वीच बुध्दीचातुर्य व शौर्याने पुरुन उरल्या.
आहिल्यामाई जगल्या रयतेसाठी, राज्य केले रयतेसाठी व अखेरपर्यंत लढल्याही रयतेसाठीच म्हणूनच त्या राष्ट्रमाता म्हणुन मान्य पावल्यात. अशा या थोर आहिल्यामाईंना ''आहिल्यादेवी व पुण्यश्लोक'' जोडले कोणी ते शोधून ते खोडले जाणे काळाची गरज आहे. कारण आहिल्यामाईंच्या संबंध आयुष्यात कर्मकांड, अंधश्रध्दा व चमत्कार यांना कुठेही थारा नव्हता याला इतिहास साक्ष आहे. स्त्रियांच्या क्रांतीसाठी त्यांचे कार्य अजोड आहे. ज्याकाळी अगदीच तुटपुंज्या शिक्षणाला व हक्कांना स्त्रिया पारख्या होत्या त्याकाळी स्त्रियांना लढाईचे शिक्षण व मुल दत्तक घेण्याचे महत्वपुर्ण हक्क देणाऱ्या ताकदीच्या राज्यकर्त्या होत्या. कैदेत असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा निरपराध गुन्हेगारांच्या स्त्रीया व मुले यांच्या उदरनिर्वाहाची सोय ही आजच्या मानवाधिकार आयोगाची कामे आहिल्यामाईंने आपल्या कारकिर्दीत केली आहेत. आहिल्यामाईंच्या न्याय, परधर्म, सहिष्णुता, दुर्बलांच रक्षण, दुष्टांना शासन आणि गुणवंताना आसन अशा या अनुपम वीरांगना राष्ट्रमातेची जयंती ही स्त्री शौर्यदिन म्हणुन घोषित करावी असं मला वाटतं. 31 मे 1725 हा अाहिल्यामाईंचा जन्मदिन आजच्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनात स्फुर्ती ओतणारा असा आहे म्हणुन याची दखल घेणं ही अत्यंत निकडीची बाब आहे.
स्त्री शक्तीचा जागर : जगाच्या पाठीवर
-----------------------------
भारतातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे कारण या देशातील स्त्री व्रतवैकल्ये, उपवास यामधून बाहेर पडायला तयार नाही. आहिल्यामाई होळकर यांच्या या जयंती निमित्त प्रत्येक स्त्रीने अंधश्रध्दा न बाळगता कर्मकांड न करता उपासतापास इ. कारणामुळे अशक्त न होता सशक्त बनून आपली पुढील पिढी सक्षम व सबल बनवण्याचा निर्धार केला पाहिजे. आहिल्यामाईंची राष्ट्रनिर्माणाची मशाल नवनिर्मितीची प्रेरणा नेहमी तेवत ठेवायची असेल तर आज प्रत्येक स्त्रीने त्यावर विज्ञानवादाचे इंधन घालणे ही काळाची गरज आहे.
ज्या राष्ट्रमातेनं संबंध आयुष्य लोकोपयोगी कार्य, स्त्रियांचा उद्धार व समाजकल्याणासाठी अर्पण केलं त्या थोर राष्ट्रमातेचा आपले कार्य काय असावे हा ज्वलंत प्रश्न उदयाच्या उज्वल भविष्यासाठी क्रांतीला इंधन देऊन सतत तेवत ठेवणारा आहे हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं मग त्या अनुषंगानं आजचा आपला अंधश्रध्दा व कर्मकांड यामुळे भरडला जाणारा शेतकरी व कष्टकरी वर्ग व पर्यायाने संपूर्ण समाज यांनी आहिल्यामाईंच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेऊन अंधश्रध्दा व कर्मकांड यांचा समूळ नायनाट करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. निराशा व अज्ञानरुपी अंध:काराचा सावट अजूनही निरभ्र झालेलं नाही त्यामुळे अंधश्रध्देच्या आहारी न जाता आपल्या लेकरांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सज्ज व्हा आणि अजुन एक गोष्ट एक चिकित्सक साहित्यिक म्हणुन माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे 'आहिल्यादेवी ' नावाची तसेच 'शिवलींगाची'. तर माझ्या माता-पित्यांनो व बंधु भगिनिंनो आहिल्यामाईंस महाराणीत्व व मानवत्व परत दयावयाचे असेल तर त्यांना देवी म्हणू नका आहिल्यामाईंच म्हणा कारण शिवलिंग धारण करणारी 'देवी ' म्हटले तर दैववाद निर्माण होतो. याउलट तलवारधारी रणरागिणी वीरांगणा आहिल्यामाई म्हटले तर अन्यायाप्रती शौर्य गाजवण्याची उर्मी संचारते. तसेच महाराणी आहिल्यामाईंनी आयुष्यात जातिधर्माला कधीही थारा दिला नाही. त्यामुळे आहिल्यामाईंना कोणत्याही जातिधर्मात बंदिस्त करणं उचित बाब नाही कारण त्या अवघ्या राष्ट्राच्याच माता आहेत.
आजच्या 31 मे या दिवशी अजुन एक गोष्ट प्रकर्षानं सांगाविशी वाटते की, माता आहिल्यामाई, माता रमाई, माता जिजाई यासारख्या अनेक महान मातांच्या कार्याकडे दृष्टीक्षेप टाकताना त्यांच्या जन्ममृत्यूच्या तारखा व सनावळया यावरच लक्ष केंद्रीत करण्याऐवजी यांच्या विचारांचा जागर केला, विचार आत्मसात करुन आचरणात आणलं तरच खऱ्या अर्थानं जयंती साजरी केल्याचं एक विलक्षण समाधान तुम्हाला लाभेल ; कारण त्यांचे विचार हे अनंत पिढयांसाठी प्रेरणादायी प्रगतीस फरक व अजरामर आहेत.त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांची खरी जयंती आहे आणि आपण सर्वांच्या माध्यमातून त्यांचे हे विचार पुढे घेऊन जाणार आहोत.
माता आहिल्यामाईंना पुढील काव्यपंक्तीत मानवंदना करतोय......
वीरांगणा-महाराणी-रणरागिणी
थोर त्या आहिल्याराणी ।।
घेऊनी विचार पुढे जाता,
गीत क्रांतीचे गात आता,
वंदितो चरणी ठेवुनी माथा,
धन्य थोर त्या आहिल्यामाता
धन्य थोर त्या राष्ट्रमाता ।
जय जिजाऊ जय शिवराय
जय ज्योती जय भिमराय ।
जय आहिल्यामाई ।।
--------------------------------
लेखक-
शिवश्री रामकिसन गुंडीबा मस्के (सर)
मो.9422930017


0 Comments