» मुंबई | प्रतिनिधी :
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बॉम्बे हायकोर्टाचे ॲड. शंकर चव्हाण यांनी ट्विटरवर (X ) ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर थेट आणि सडेतोड टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, "सुरक्षा यंत्रणा फेल ठरली आहे. मोदी सरकार अपयश झाकण्यासाठी पाकिस्तान विरोधात कारवाईचं नाट्य करत आहे."
पहलगामसारख्या संवेदनशील भागात सुरक्षेची गैरहजेरी – चुकी कोणाची?
ॲड. शंकर चव्हाण म्हणतात, "जिथे देश-विदेशातील पर्यटक येतात, अशा पहलगामसारख्या भागात सुरक्षा रक्षकच उपस्थित नसतील तर ती व्यवस्था कशाला? एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुप्तचर यंत्रणा असूनही दहशतवादी हल्ला होतो, म्हणजे नियोजनशून्यता आणि दुर्लक्ष याची प्रचिती येते."त्यांनी सरकारला प्रश्न केला की, "दहशतवाद्यांनी इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रसज्ज येऊन हल्ला केला, हे खूप आधी टिपलं गेलं पाहिजे होतं. पण नेहमीप्रमाणे ‘हल्ल्यानंतरची कारवाई’ हाच एकमेव कार्यक्रम सरकारकडे शिल्लक राहिला आहे."
मिशन सिंदूर की मिशन ढोंग?
"महिलांना सन्मान देण्याच्या नावाखाली मिशन सिंदूरसारखी योजना चालवली जाते. पण त्या महिलांचे पती आज शहीद झाले. त्यांना वाचवण्यासाठी कोणतं मिशन सुरू केलं होतं?"ॲड. शंकर चव्हाण पुढे म्हणतात, "देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे अनेक माता-विधवा झाल्या, बालक पोरके झाले. हीच का तुमची 'नारी सन्मान' योजना?"
‘देशप्रेम’ नारेबाजीपुरतं मर्यादित – कृतीतून काहीच नाही
"देशप्रेम केवळ भाषणांतून दाखवायचं, कृतीतून नव्हे का? सत्तेवर असताना प्रत्येक गोष्ट ‘देशभक्ती’च्या झेंड्याखाली लपवली जाते. पण हल्ल्याच्या आधी सावधगिरी बाळगली असती तर मृत्यू टाळता आले असते," असं सांगून ॲड. शंकर चव्हाण यांनी सरकारला थेट जबाबदार धरलं.
माध्यमांची जबाबदारी कुठे? फक्त TRP साठी राष्ट्रवाद?
ॲड. शंकर चव्हाण म्हणाले, "राष्ट्रीय माध्यमं आज सरकारचं मुखपत्र झाली आहेत. लोकशाहीत माध्यमं चौथा स्तंभ असतात. पण आज ते फक्त 'राष्ट्रवाद' आणि युद्धाचे नारे दाखवण्यात गुंतलेत."त्यांनी खंत व्यक्त केली की, "खोट्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ पसरतोय. कोणतीही टीका केली की ती ‘देशद्रोह’ ठरवली जाते."
‘हल्ला झाल्यावर’ कारवाई का? आधी रोखता आलं नाही का?
"सतत हल्ल्यानंतरच प्रतिक्रिया का? जे आधी टाळता आलं असतं ते टाळण्यासाठी यंत्रणा का अकार्यक्षम आहेत? ॲड. शंकर चव्हाण यांचा रोख होता की, “ज्यांना जनतेची मते हवीत, त्यांच्याकडून जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावीच लागेल.”
पाकिस्तानवर हल्ला म्हणजे अपयश लपवण्याचा प्रयत्न
"पाकिस्तानवर कारवाई केली हे सांगून सरकार आपल्या निष्क्रियतेचं समर्थन करू शकत नाही. जर खरंच बदला घ्यायचा होता, तर आधी का नाही घेतला?" ॲड. शंकर चव्हाण यांनी गंभीर आरोप केला की, "या सर्व घटनांमागे सरकारचा एकमेव हेतू म्हणजे आपली प्रतिमा टिकवून ठेवणं आणि निवडणुकीच्या काळात जनतेचं लक्ष मूळ मुद्द्यांपासून दुसरीकडे वळवणं."
जर युद्ध सुरू केलं, तर माघार का घेतली?
"तुम्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करता आणि दोन दिवसांनी मागे फिरता – याचा अर्थ काय? ही फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीची कसरत तर नाही ना? ॲड. शंकर चव्हाण पुढे म्हणतात की, "युद्धाची घोषणा करून जर तुम्ही कारवाई अर्धवट ठेवत असाल, तर हा केवळ राजकीय स्टंट आहे."
सामान्य जनतेचा संताप उसळला आहे
"सुरक्षेच्या अपयशामुळे देशभरात सामान्य नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. प्रत्येकजण विचारतो आहे – आमच्या जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? ॲड. शंकर चव्हाण यांचं म्हणणं आहे की, "लोकांना केवळ भावनिक करून निवडणुका जिंकता येतील, पण सुरक्षा, विकास, आणि विश्वासार्हता यासाठी कार्यक्षमतेने काम करावं लागेल."
खरी देशभक्ती म्हणजे जबाबदारी स्वीकारणं
शेवटी ॲड. शंकर चव्हाण यांनी ठामपणे म्हटलं, "देशभक्ती हे भाषणात नसून कृतीत दिसावं लागतं. जर तुम्हाला खरंच देशासाठी काही करायचं असेल, तर तुम्ही तुमचं अपयश मान्य करा, जबाबदारी स्वीकारा आणि पाकिस्तानला कायमचं उत्तर द्या."ते म्हणाले, "जनता आता मूर्ख नाही. ती तुम्ही सांगाल ते ऐकेलच असं नाही. लोक सडेतोड उत्तर मागत आहेत आणि ते तुम्हाला द्यावं लागेल."

0 Comments