बीडमध्ये गुन्हेगारीचा उद्रेक! कायदा-सुव्यवस्था धाेक्यात महाराष्ट्र सरकारने ठाेस पावले उचलावीत - अ‍ॅड. शंकर चव्हाण


बीडमध्ये गुन्हेगारीचा उद्रेक! कायदा-सुव्यवस्था धाेक्यात 

महाराष्ट्र सरकारने ठाेस पावले उचलावीत - अ‍ॅड. शंकर चव्हाण

» बीड | प्रतिनिधी : दैनिक शिवजागर

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून, लूटमार, खंडणी वसुली, जातीय दंगली आणि गुंडाराजामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढले आहे. समाजातील विविध घटक आणि राजकीय नेते या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर ॲड. शंकर चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, "बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही. गुन्हेगार खुलेआम हिंसक कृत्ये करत आहेत, तर पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून गप्प आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त उद्घाटन समारंभांत मग्न असून, जनतेच्या सुरक्षेकडे कोणीही लक्ष देत नाही. सरकारने त्वरीत ठोस पावले उचलून जिल्ह्यात शिस्तीचे वातावरण निर्माण करावे.

ट्रक ड्रायव्हरची निर्घृण हत्या 

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये हिंसक घटना सातत्याने घडत असून, शनिवारी रात्री आणखी एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विकास बनसोडे (२३) या तरुणाला दोन दिवस खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर ही घटना उघडकीस आली आणि संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथे घडली असून, संशयित आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत विकासचे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतला. याच संशयावरून त्याने विकासला दोन दिवस खोलीत डांबून ठेवले आणि अमानुष मारहाण करून त्याचा जीव घेतला.

हत्या कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, विकास बनसोडे मागील तीन वर्षांपासून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही दिवस विकास गावाबाहेर गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो मित्रासोबत पिंपरी येथे परतला. संध्याकाळी तो संशयित आरोपीच्या मुलीसोबत घरामागील शेतात बोलताना दिसला. याची माहिती मिळताच भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या साथीदारांनी विकासला पकडले, त्यांच्या घरात नेले आणि दोन दिवस बंद खोलीत ठेऊन क्रूरपणे मारहाण केली. मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास आणि नागरिकांचा संताप

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, अजूनही आरोपी फरार आहेत. बीड जिल्ह्यातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "आरोपी खुलेआम फिरत आहेत, पोलिस मात्र कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत," अशी नागरिकांची भावना आहे.

कायद्याचा धाक उरला नाही? – नागरिक संतप्त

बीड जिल्ह्यातील अनेक भागांत कायद्याचा धाक उरलेला नाही असे चित्र आहे.   दिवसाढवळ्या हत्या, जबरी चोरी, खंडणी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. "गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाक वाटत नाही. अनेक गुन्हेगार राजकीय पाठबळामुळे मोकाट सुटले आहेत. पोलिस फक्त किरकोळ गुन्हेगारांना पकडतात, पण मोठे गुन्हेगार निर्धास्त फिरत आहेत," असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.

सरकारने तातडीने कारवाई करावी – नागरिकांची मागणी

बीड जिल्ह्यातील नागरिक या सततच्या हिंसक घटनांमुळे संतप्त झाले आहेत. काही नागरिकांनी सोशल मीडियावर      सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. "लोकप्रतिनिधींना उद्घाटने करण्यात रस आहे, पण नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता नाही. जर पोलिस आणि सरकारने ठोस कारवाई केली नाही, तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल," अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी – ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

या घटनेनंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी राज्य सरकारकडे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. "या घटनेमुळे केवळ बीडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जर सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत, तर गुन्हेगारी आणखी वाढेल. आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी," अशी त्यांची मागणी आहे.

गृहमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आश्वासन

या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने याची दखल घेतली असून, पोलिसांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की, "बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल आणि पोलिस प्रशासन अधिक सतर्क राहील याची काळजी घेतली जाईल."

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्था पूर्ववत होणार का?

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासन आणि सरकार जर लवकरच कठोर कारवाई करत नसेल, तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शासनाच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले – ॲड. शंकर चव्हाण

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, सतीश भोसले प्रकरण आणि आता विकास बनसोडे हत्या प्रकरण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सतत मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गुन्हेगार खुलेआम दहशत माजवत आहेत, मात्र प्रशासन त्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत आहे.

ॲड. शंकर चव्हाण यांनी बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "गुन्हेगारांना जरब नाही. पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि गृहखाते याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

—————

Post a Comment

0 Comments