कविवर्य संतोष पाटील यांच्या 'स्पर्श मनाचा' या काव्य संग्रहाविषयी...


 कविवर्य संतोष पाटील यांच्या 'स्पर्श मनाचा' या काव्य संग्रहाविषयी...

संतोष पाटील या नव कवीचा साहित्य क्षेत्रातील  पहिला वहिला काव्यसंग्रह 'स्पर्श मनाचा' हा काव्यसंग्रह वाचून काढला.   कविता वाचताना कवीच्या  शब्दांनी माझ्या मनाला खूप  स्पर्श केला आहे. यातून कवीचे हळवेपण, संवेदनशीलता, अफाट निरीक्षण क्षमता आणि काव्य प्रतिभा दिसून आली.   काही कविता वाचताना मन ढवळून निघालं. आई बाबांच्या, लेकीच्या कवितांना वाचकांकडून भरभरून दाद मिळेलच असा विश्वास वाटतो.  प्रत्येक कविता हृदयाला भिडली.  काही कवितांमधून काळजात साठवलं गेलेलं दुःख प्रकर्षानं जाणवलं. कवीने  भावनांचे चित्रण इतके सजीव आणि वास्तव केले आहे की, वाचकांना त्यांच्या स्वत:च्या अनुभवांशी जोडण्यास मदत होते. स्त्रीभ्रूणहत्या या ज्वलंत विषयावर केलेली कविता माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. सैनिकांचं दुःख, त्याग आणि समर्पण मन हेलावून टाकणारे आहे. काव्यांमध्ये व्यक्त केलेल्या भावनांची सखोलता आणि शब्दांची निवड यामुळे कविता वाचकांच्या मनाला स्पर्शून न गेल्या तरच नवल. या काव्य संग्रहातील प्रत्येक कविता जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते, जे वाचकांना आपल्या आयुष्यातील विविध घटनांशी जोडण्यासाठी प्रेरित करते. काव्य संग्रहाच्या अखेरीस दिलेले प्रेरणादायी विचार दर्शवितात की आयुष्य म्हणजे अंधाराने व्यापून टाकलेला बोगदा पण बोगद्याच्या अखेरीस लख्ख प्रकाश असतो हे कवीने मोठ्या खुबीने मांडले आहे. हे केवळ विचार नाहीत तर अमूल्य असं विचारधन आहे. त्याचं मूल्य केवळ शब्दातीत. हे सर्व वाचत असताना मनाच्या अथांग सागरा मध्ये विचारांच्या असंख्य लाटा उसळत राहिल्या. शब्दा शब्दातून मानवी दुःख, चटके, फटके, दाहकता, घुसमटलेपण, व्याकुळता, असहाय्यता, अगतिकता दिसून आली. कवीचा ध्यास, तळमळ, त्याग, समर्पित वृत्त्ती,  आशावाद आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ही दृष्टीस पडला. कवितांमधून आपण केवळ मनाला स्पर्शच केला नाहीत तर कवीने अनेकांच्या हृदयात स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मी आपल्याला या उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्या भावी काव्यप्रवासात आपण अशाच प्रेरणादायी आणि मनमोहक काव्यांची निर्मिती करत राहावी, यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्या मध्ये उद्याचा एक प्रतिभावंत लेखक, कवी आणि समृद्ध साहित्यिक दडला आहे. हा काव्यसंग्रह केवळ एक सुरुवात आहे. अजून पुढे खूप काही बाकी आहे. आपल्या काव्यांच्या यशासाठी आणि आपल्या भावी काव्यप्रवासासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा!

अभिप्राय: 

प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी

Post a Comment

0 Comments