‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली अंबाजोगाईकरांच्या विश्वविक्रमाची नोंद; आई सेंटरच्या माध्यमातून विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांच्या नेतृत्वात फडकावला ७५ फुट लांबीचा तिरंगा


अंबाजोगाई (वार्ताहर) : 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांत जास्त लांबीचा राष्ट्रध्वज सर्वांत उंच ठिकाणी १५ ऑगस्ट २०२२ रोजी फडकविण्याचा जागतिक बहुमान अंबाजोगाई येथील 'आई' सेंटर (इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर) ला मिळाला आहे. सदरील विश्वविक्रम केल्याच्या नोंदीचे प्रमाणपत्र 'आई' सेंटरचे संचालक आणि विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांना ‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' या संस्थेकडून नुकतेच प्राप्त झाले असून त्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, ‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' या संस्थेच्या वतीने सर नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झालेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, सर नागेश जोंधळे, आम्हाला तुमच्या रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत आणि तुमचे रेकॉर्ड आमच्याकडून स्विकारले गेले आहे. सदरील प्राप्त माहितीनुसार आपण 'इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर' अर्थात 'आई' सेंटरने फडकविलेला सर्वांत जास्त लांबीचा भारतीय ध्वज आणि जास्तीत-जास्त सहभागींसह फडकावणारी भारतातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांत जास्त लांबीचा राष्ट्रध्वज शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांसह आणि संस्थेच्या हितचिंतकांसह ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाण टीव्ही सेंटर, अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र, भारत येथे फडकावला. या  उपक्रमाची नोंद भारतातील सर्वांत मोठ्या शैक्षणिक टीम सदस्यांसह सर्वांत जास्त लांबीचा भारतीय ध्वज फडकावला, अशी ठरली आहे. हा उपक्रम सर नागेश जोंधळे ‘आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था' चे अध्यक्ष, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचे 'बेस्ट सेलिंग लेखक' नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्याने करणे शक्य झाले आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ऐतिहासिक ७५ वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि हा महोत्सव 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून ओळखला जातो. म्हणून ही घटना विशेष उल्लेखनीय आहे. सदरील मजकूर असलेले ‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' या संस्थेच्या वतीने हे पत्र 'आई सेंटर'चे संचालक सर नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून या सन्मानाबद्दल या उपक्रमात यशस्वी नेतृत्व करणारे विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांच्यासह विशेष सहभागी झालेले 'स्वाराती' चे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, कृषी महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रप्रमुख इंजि.सदाशिव चापुले, मेडिसिन विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, छातीविकार तज्ज्ञ डॉ.राहुल धाकडे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, जगन सरवदे, दादासाहेब कसबे, संपादक रणजित डांगे, प्रा.डॉ.इंद्रजीत भगत, प्रा.डॉ.अनंत मरकाळे, प्रा.डॉ.किरण चक्रे, प्रख्यात कवी राजेश रेवले, अरूण शिंदे, सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे टेलर महादेव पुदाले या मान्यवरांसह 'आई' सेंटरचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, हितचिंतक सर्व फॅमिली मेंबर्स यांनी सर नागेश जोंधळे यांचे विशेष आभार मानले आहेत. गतवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनी कोकणकड्यावर केलेल्या विश्वविक्रम 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' व 'इंडिया रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली होती. त्यावेळी ही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नागेश जोंधळे यांच्यासह एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे (सोलापूर), सिनेअभिनेत्री मीरा जोशी (मुंबई), राहुल बनसोडे (नाशिक) आदींसह ४५ गिर्यारोहकांनी नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या संकल्पनेतून आणि आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आई सेंटरच्या माध्यमातून आयोजित उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांकडून अंबाजोगाई शहरानजीक पिंपळा धायगुडा गावा शेजारील दूरदर्शन केंद्रानजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी मोठ्या आकाराचा तब्बल ७५ फुट लांबी आणि सहा फुट रूंदी असलेला तिरंगा ध्वज नुकताच १५ ऑगस्ट रोजी फडकावला. या अभिनव उपक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत तसेच ४ वर्षे वय असलेल्या बालकापासून ते अंदाजे ६० वर्षे वयापर्यंतचे १०० हून अधिक युवक, युवती, विद्यार्थी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले हे विशेष होय.


अंबाजोगाईकरांची मान उंचावणारी कामगिरी
====================
अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक सृजनशील व्यक्तिमत्त्व 'आई सेंटर'चे संचालक सर नागेश जोंधळे हे मागील एक दशकापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. असे असतानाच ते गतवर्षी कोकणकडा येथील मोहिमेत सहभागी झाले होते. यावर्षी ही त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिनी तरूणांना प्रेरित करीत मोहिमेचे आयोजन करून स्वतः सहभागी होऊन हा विश्वविक्रम प्रस्थापित केल्यामुळे जोंधळे सर यांनी अंबाजोगाईकरांची मान सर्वदूर उंचावली आहे.

- नंदकिशोर मुंदडा
(ज्येष्ठ समाजसेवक,अंबाजोगाई.)


अभिमानाचा क्षण..!
====================
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा भारतीय ध्वज अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा गावाशेजारील दूरदर्शन केंद्रानजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर अतिशय उंच अशा ठिकाणी फडकताना प्रत्येकासाठीच हा क्षण तसा ऐतिहासिक व अभिमानाचा होता. अंबाजोगाईकरांनी केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ‘द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली आहे. याचा एक अंबाजोगाईकर म्हणून मोठा आनंद आहे. आम्ही ही मोहीम आई सेंटरच्या माध्यमातून 'शक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे या समर्पित भावनेतून राबविण्यात आली याचा विशेष आनंद आहे.

- सर नागेश जोंधळे
('द डायनॅमिक कम्युनिकेटर' या ॲमेझॉनवरील बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक तथा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार विजेते.)

Post a Comment

0 Comments