जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांचा दौरा केला.खेडोपाडी जावून ज्येष्ठ नेते, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.त्यांची मते जाणून घेतली.वाडी,वस्ती, तांडे,गावात रात्री मुक्काम केला. काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा नवा विश्वास दिला.याचा फायदा आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला होतांना दिसू लागला आहे.नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना तिकीटे दिल्याने केज,वडवणी,आष्टी,पाटोदा,शिरूर या सर्व पाचही नगरपंचायतींची निवडणूक लढविली.यामुळे बीड जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याचे दिसून आले.याविषयी अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,बीड जिल्ह्यात स्वबळावर लढून सत्तेत येण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाचही तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते यांच्या सोबत प्राथमिक बैठका घेतल्या.आघाडीचा धर्म पाळत आष्टी,पाटोदा या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करून तर केज,वडवणी,शिरूर या तीन ठिकाणी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे.श्री.देशमुख म्हणाले,‘‘भविष्याचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नगरपंचायतींचा आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार व्हायला हवा.काँग्रेस पक्ष काही महत्त्वकांक्षी योजनांचे वचन ग्रामीण जनतेला देऊ इच्छित असून,या कार्यक्रमावर आधारित हा पक्ष निवडणुकीला सामोरा गेला.काँग्रेस पक्षाचे सर्व नेते- कार्यकर्ते यांनी एकत्रित बसून समन्वयाने उमेदवार निश्चित केले.सर्वांना बरोबर घेऊन जाणारी राजकीय संस्कृती काँग्रेसने निर्माण केली.परंतु,अलीकडच्या काळात या सत्ता स्पर्धेला बीड जिल्ह्यात सवंग-उथळ राजकारणाचे स्वरूप आले.
या राजकारणाच्या मार्गाने ग्रामीण जनतेचे भले होणार नाही.त्या साठी प्रत्येक गावाने आता स्वतःचे सुसंस्कृत नेतृत्व पुढे आणले पाहिजे.नगरपंचायतीची होणारी निवडणूक हे त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल.ही निवडणूक काँग्रेससाठी दिशादर्शक ठरली आहे.यापुढे ही प्रत्येक निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल आणि स्वबळावर सत्ताही स्थापन करेल,असा विश्वास बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.

0 Comments