एअर इंडियाच्या पंखांना टाटांचे बळ ...
तब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे गेली आहे. टाटाने या कंपनीच्या विक्रीसंदर्भातला लिलाव जिंकला. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली जिंकली. यापूर्वी एअर इंडिया ही पुन्हा टाटा समुहाकडे जाणार या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं परंतु अखेर यावर शिक्कामोर्तब झाल आहे. एअर इंडिया ही कंपनी पूर्वी टाटाच्याच मालकीची होती. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने ही कंपनी अखत्यारित केली होती. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला. एअरलाईनने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. वर्ष १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली त्याच्या गंतव्यस्थानांमध्ये जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली. १९५३ मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने आपल्या ताफ्यात आपले पहिले बोईंग ७०७-४२० समाविष्ट केले. विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरू केली. ८ जून १९६२ रोजी एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले आणि ११ जून १९६२ रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनी बनली. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. एव्हिएशन फ्युएल म्हणजेच विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या वाढलेल्या किंमती, एअरपोर्ट वापरासाठीचे वाढलेले दर, लो-कॉस्ट विमान कंपन्यांकडून होणारी स्पर्धा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरलेलं मूल्य आणि खराब आर्थिक कामगिरीमुळे वाढलेल्या कर्जावरील व्याजाचा डोलारा या सगळ्याचा परिणाम एअर इंडियावर झाला. यानंतर २०१७ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिली.सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला. सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली. जर एअर इंडियाला विकलं नसतं तर सरकारकडे तिला बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. या खरेदीचे टाटांना अनेक फायदे होणार आहे. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे भावनिक नातं असलेली ही कंपनी पुन्हा आपल्याकडे आल्याचे समाधान टाटांना मिळेल. एअर इंडियावर शंभर टक्के मालकी टाटांची असेल. त्यात एअर इंडिया एक्स्प्रेसचीही मालकी असेल. शिवाय मालवाहतूक आणि ग्राउंड हॅन्डलिंग करणारी एआयएसएटीएस या कंपनीची ५० टक्के मालकही मिळेल. एअर इंडियाकडे एकूण १४६ विमानं असून एकूण ताफ्याच्या ५६ टक्के विमानं कंपनीच्या मालकीची आहेत. याशिवाय कंपनीकडे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवरच्या मोक्याच्या लँडिंग आणि पार्किंगच्या जागा आहेत. एअर इंडियावर एकूण ३८,३६६.३९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडिया अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) ला २२,०६४ कोटी रुपये हस्तांतरित केल्यानंतर एवढी रक्कम उरते. कर्जाचं प्रमाण मोठं असल्याने हे एक आव्हान ठरू शकतं. कारण जवळपास ७० विमानांसाठी त्यांना पुढची ८ ते १० वर्षं परतफेड करावी लागणार आहे. शिवाय कंपनी विकत घेणाऱ्या टाटा सन्सला यामध्ये भरपूर पैसा ओतावा लागेल. म्हणूनच ही कंपनी चालविण्यासाठी सुरुवातीला खूप खर्च असेल. याशिवाय एअर इंडियाच्या १४,००० पेक्षा जास्त लोकांचा ताफा सांभाळणंही आव्हान ठरणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- सुरेश मंत्री, अंबाजोगाई. संपर्क - ९४०३६५०७२२.

0 Comments