"उच्च शिक्षणातील करियर च्या नव्या संधी,नव्या दिशा देण्यासाठी एकलव्य तर्फे निवासी कार्यशाळेचे आयोजन"



 देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत योगदान निश्चित करणे ही काळाची  गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचे तरुण मनुष्यबळ सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे पण दर्जेदार उच्च शिक्षणा अभावी  मोठा तरुण वर्ग आजही बेरोजगार आहे. उच्च शिक्षणासाठी जी काही थोडीफार चांगली विद्यापीठे वा संस्था आहे तिथे ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का कमी आहे.  या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एकलव्य विविध कार्यक्रम राबवते. विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाच्या आणि करिअरच्या पर्यायी संधी विषयी माहिती देण्यासाठी आणि त्याबद्दल जाणीव, जागृती करून शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगळेगळ्या भागात निवासी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. ग्रामीण आणि विशेषतः पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार्यशाळा घेतली जाते. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमधून शिकलेले १०० पेक्षा जास्त मेंटर्सद्वारे सतत मार्गदर्शन केले जाते. बदलत्या काळातील उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावर दोन निवासी कार्यशाळेचे आयोजन पुढीप्रमाणे केले आहे. पाहिली कार्यशाळा दि २२, २३, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी मानवी हक्क अभियान, तेलगाव, ता. धारूर, जि. बिड येथे आणि दुसरी कार्यशाळा दि २९, ३०, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर ता. माणगाव जि. रायगड येथे आयोजीत केली आहे.

कार्यशाळेची वैशिष्टे:

१) देशातील आणि विदेशातील नामांकित शिक्षण संस्थामधील उच्च शिक्षणाच्या संधीबद्दल मार्गदर्शन  (ह्युमॅनीटीज आणि सोशल सायन्सेस या क्षेत्रात)

२) ग्रामीण भागातील आणि  शिकणाऱ्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन मार्गदर्शन आणि समुपदेशन.

३) देशातील विविध नामांकित विद्यापीठांमधील मेंटर्स आणि विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी.

४) गट चर्चा आणि ग्रूप ॲक्टीविटी आधारीत सत्र

५) निवासाची भोजनाची प्रशस्त व्यवस्था 

पात्रता- पदवी अंतीम वर्षाला असणारे किंवा पदवी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.

 महाराष्ट्रातील जास्तीत तरुणांनी या कार्यशाळेसाठी नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. नोंदणी साठी ७०८३२३१७३२ या क्रमांकावर संपर्क करावा किंवा https://bit.ly/eklavya_workshop या लिंकवर क्लिक करावे. 

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी  दहावी बारावी झाल्याबरोबर पोलीस भरती, रेल्वे भरती, कर्मचारी चयन आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर सरकारी खात्याच्या भरती परीक्षेच्या तयारीसाठी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, किंवा मोठ्या शहराच्या ठिकाणी धाव घेतात. दरवर्षी अशा लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांची भर पडत आहे ज्यांचे पुढचे शिक्षण स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीवर्गातून घडते. विद्यापीठांची जागा अशा खासगी शिकवणी सस्थांनी घेतल्याचे चित्र आज महाराष्ट्रभर दिसत आहे. शासकीय नोकरीतील संधी कमी असल्यामुळे आयुष्यातील उमेदीची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घालवूनही हाती यश लागण्याची शक्यता अत्यंत कमीच असते. असे असूनही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण, कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव, पालकांच्या अपेक्षा, पर्यांयांबाबतची अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी स्पर्धेच्या दुष्टचक्रात फसलेले आहेत. आयुष्यातील महत्वाची वर्षे घालवूनही यश न आल्याने असे तरुण आत्मविश्वास हरवून शेवटी हताश होऊन बसतात. अशा तरुणांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून करिअरचे पर्याय याविषयी मार्गदर्शन एकलव्य च्या कार्यशाळेतून केले जाते.

आजही समाजातील मोठा वर्ग पिढ्यानपिढ्या उच्च शिक्षणापासून वंचित राहिला आहे. देशातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे हे आकडे सांगतात. योग्य मार्गदर्शन आणि मेंटरींग चा अभाव, कुटुंबाची परिस्थिती, शिक्षण आणि नोकरीकडे चे बघण्याचा पारंपारीक दृष्टिकोन अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी संधींपासून वंचित राहतात. देशातील नामांकित विद्यापीठांत शिकण्यासाठी इंग्रजी भाषेचा सुद्धा अडथळा त्यांच्यापुढे असतो कारण बहुतेक ग्रामीण भागातील विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकलेले असतात. अशा समस्यांवर मात करून दर्जेदार उच्च शिक्षण आणि त्यानंतर अर्थपूर्ण करिअर निश्चित करण्यासाठी एकलव्य विद्यार्थांना सक्षम बनवते. यवतमाळ स्थित एकलव्य अकॅडमी मागील ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, बहुजन विद्यार्थांसोबत काम करत आहे आणि या प्रयत्नांतून आतपर्यंत ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी तसेच प्रतिष्ठीत फेलोशिप मध्ये प्रवेश मिळवला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बंगलोर, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, आयआयटी, आयआयएम अशा नामवंत विद्यापीठांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. इथून मास्टर्स झालेले विद्यार्थी पुढे सोशल किंवा डेव्हलपमेंट सेक्टर मध्ये अर्थपूर्ण करियर करत आहेत. तसेच गांधी फेलोशिप, गुंज फेलोशिप, नीती आयोग अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट फेलोशिप, एस बी आय यंग इंडिया फेलोशिप अशा प्रतिष्ठीत कार्यक्रमांत काम करत आहेत. 

उच्च शिक्षणाच्या माध्यमातून जमिनीवरचे नेतृत्व (Grassroots Leadership) उभे व्हावे या ध्येयाने एकलव्य ही संस्था काम करते. काही महिन्यांपूर्वी एकलव्य चे संस्थापक श्री राजु केंद्रे यांना एकलव्य च्या कामाची दखल घेत जगातील प्रतिष्ठीत अशी चेवनिंग फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिप मुळे ते लंडन मधे शिकून मायदेशी परत आल्यानंतर एकलव्य चे काम वाढविण्यासाठी लोकल ते ग्लोबल नेटवर्क ची मदत होणार आहे.  शिक्षण, आरोग्य, संशोधन, धोरण अशा सर्वच क्षेत्रात Grassroot Leaders निर्माण होणे ही काळाची गरज आहे आणि यासाठी एकलव्य कार्यरत असणार आहे.

Post a Comment

0 Comments