मराठी साहित्य म्हणजे एखादे पुस्तक नाही, तो एक अथांग महासागर आहे. या महासागराला पैलतीरावर नेण्याचे पहिले आणि सर्वात मोठे कार्य *संत ज्ञानेश्वरांनी* केले. ज्या काळात संस्कृतचाच पगडा होता, त्या काळात त्यांनी —
> *"माझा मराठाचि बोलु कौतुके । परि अमृतातेहि पैजा जिंके ।"*
असे ठामपणे सांगत मराठी भाषेला आत्मविश्वास दिला. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीला वैचारिक आणि तात्त्विक बैठक दिली. तोच पाया पुढे संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी भक्तीच्या कळसाने अधिक मजबूत केला. नंतरच्या काळात शाहिरांनी त्याला शौर्याची धार दिली, तर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांसारख्या आधुनिक प्रतिभांनी त्याला संवेदनेची नवी किनार लावली.
हा वारसा एका पिढीचा नाही, तो शतकानुशतकांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे.
आज प्रश्न हा आहे की, या अथांग वारशाचे करायचे काय? तो फक्त कपाटात ठेवून त्याची पूजा करायची की त्याच्या लाटांवर स्वार होऊन पुढे जायचे?
ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात जे धाडस केले, तेच धाडस आजच्या तरुणाला दाखवावे लागेल. त्यांनी त्यांच्या काळातील बंधनाला झुगारून मराठीत लिहिले. आज तुम्हालाही ट्रेंडच्या बंधनाला झुगारून अस्सल मराठीत लिहावे लागेल.
आजच्या तरुणाला मोठे उपदेश नको आहेत. त्याला त्याच्या भावनेत बोललेले आवडते. त्याला —
> *"असा जगण्यात अर्थ आहे, जगण्यातच स्वार्थ आहे"*
असे थेट काळजात भिडणारे शब्द हवे आहेत.
पूर्वी साहित्य शिकवायचे, आजचे साहित्य सोबत करते. पूर्वी लेखक मोठा वाटायचा, आजचा लेखक आपल्यातलाच एक मित्र वाटतो. हाच बदल महत्त्वाचा आहे. एक छोटीशी चारोळी, एक छोटीशी कथा, एका तरुणाच्या मनाला आधार देऊन जाते, ही ताकद कोणत्याही मोठ्या कादंबरीपेक्षा कमी नाही.
ज्यांनी या साहित्याला किनार लावली, त्यांचे प्रयत्न तेव्हाच सार्थकी लागतील जेव्हा आजची तरुण पिढी फक्त वाचक न राहता लेखकही होईल. ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, या विचाराने प्रेरणा घ्या. वय हा निकष नाही, तुमच्यातील संवेदना महत्त्वाची आहे.
तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे, आत्मा तर आपलाच असला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी दिलेला मराठीचा आत्मविश्वास आजच्या डिजिटल युगात अधिक तेजाने पुढे नेणे, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
✦ ✦ ✦
*लेखिका : सौ श्रुती सुनील पवार*
*जिल्हा - नाशिक*

0 Comments