'देऊळबंद २' चा संपूर्ण नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी; प्रवीण तरडे यांचा निर्णय चित्रपटसृष्टीसाठी आदर्श – अ‍ॅड. शंकर चव्हाण

 


मुंबई | प्रतिनिधी : 

'देऊळबंद २' या आगामी मराठी चित्रपटाच्या संपूर्ण नफ्याचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी घेतलेला निर्णय हा केवळ कौतुकास्पद नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. शंकर चव्हाण, अधिवक्ता, मा. उच्च न्यायालय मुंबई तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, जनहित लोकशाही पार्टी  यांनी व्यक्त केली आहे. अ‍ॅड. शंकर चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रवीण तरडे यांचे कौतुक केले त्यात  म्हटले आहे की, आज चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेले नाही. समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद चित्रपटसृष्टीमध्ये आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या कमाईचा संपूर्ण नफा समाजातील सर्वाधिक गरजू घटकांसाठी समर्पित करण्याचा निर्णय हा सामाजिक उत्तरदायित्वाचा सर्वोच्च आदर्श आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकरी विविध कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा वेळी सर्वाधिक हाल त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः मुलांच्या शिक्षणाचे होतात. अनेक हुशार विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. त्यामुळे प्रवीण तरडे यांनी घेतलेला निर्णय हा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. अ‍ॅड. चव्हाण म्हणाले, "समाजासाठी काम करणारे अनेक कलाकार आपण पाहिले आहेत; मात्र स्वतःच्या चित्रपटाचा संपूर्ण नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित करण्याचा निर्णय अत्यंत दुर्मिळ आहे. हा निर्णय केवळ दान नाही, तर सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा सर्वोच्च संदेश आहे. "त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय राज्यघटनेतील कलम २१-अ प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार प्रदान करते. तसेच राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वांनुसार दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी समाजाने आणि शासनाने संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा वेळी प्रवीण तरडे यांच्यासारख्या संवेदनशील कलाकारांनी पुढाकार घेणे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. अ‍ॅड. चव्हाण यांनी राज्य सरकार, उद्योगपती, चित्रपट निर्माते आणि समाजातील दानशूर व्यक्तींनाही आवाहन केले की, समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावेत. शिक्षण, आरोग्य, शेतकरी कल्याण आणि अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी चित्रपटसृष्टीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून योगदान दिल्यास समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. ते पुढे म्हणाले की, प्रवीण तरडे यांनी केवळ एक चित्रपट निर्माण केलेला नाही, तर समाजाला संवेदनशीलतेचा आणि कर्तव्यभावनेचा संदेश दिला आहे. कला आणि समाजकारण यांचा सुंदर संगम कसा असावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. अ‍ॅड. शंकर चव्हाण यांनी शेवटी म्हटले, "आज मी प्रवीण तरडे यांना 'द ग्रेट प्रवीण तरडे' म्हणतो, कारण त्यांनी यश, प्रसिद्धी आणि आर्थिक लाभापेक्षा समाजातील वंचित मुलांचे भविष्य निवडले आहे. हा निर्णय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक चित्रपटप्रेमीने 'देऊळबंद २'ला भरभरून प्रतिसाद देऊन या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, हीच खरी प्रवीण तरडे यांना मानवंदना ठरेल."

**********



Post a Comment

0 Comments