लातूरची शर्वरी डोंगरे संगीत विशारद परीक्षेत भारतात प्रथम; २२ ऑगस्टला सात पुरस्कार देऊन मुंबईत होणार गौरव

लातूर| प्रतिनिधी:

लातूरच्या कु. शर्वरी विवेक डोंगरे हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत विशारद परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवत लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

   अथक परिश्रम, जिद्द, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण रियाज यांच्या बळावर तिने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

विशेष म्हणजे, शर्वरीच्या कुटुंबात शास्त्रीय संगीताची कोणतीही परंपरा नसतानाही तिने स्वतःच्या जिद्दीच्या बळावर संगीत क्षेत्रात हे मानाचे यश मिळवले आहे. दररोज पाच ते सहा तास नियमित स्वरसाधना, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच ती आज देशात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. या यशामागे तिचे आई-वडील व संपूर्ण कुटुंबीयांचे मोलाचे पाठबळ लाभले आहे.

शर्वरीची ही कामगिरी एका दिवसात घडलेली नाही. यापूर्वीही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या मध्यमा पूर्ण (पाचव्या ) परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या वेळीही तिने ठरवले होते "मला भारतात प्रथम यायचेच" हा निर्धार करून तिने सातत्याने अभ्यास आणि रियाज केला होता. त्याच जिद्दीच्या जोरावर आता संगीत विशारद परीक्षेतही भारतात प्रथम येत तिने आपल्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे.

शर्वरीच्या संगीत प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे २०२१-२२ या वर्षासाठी शास्त्रीय गायन क्षेत्रातील केंद्र शासनाची प्रतिष्ठेची 'सी.सी.आर.टी. (CCRT)' शिष्यवृत्ती तिला प्राप्त झाली आहे. ही शिष्यवृत्ती तिच्या कलागुणांची, सातत्यपूर्ण साधनेची आणि गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जाते, खरे तर ही शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी असते दोन वर्षानंतर ज्यावेळेस प्रोग्रेस रिपोर्टसाठी बोलावले त्या प्रोग्रेस रिपोर्ट मधील प्रगती पाहून तिला आणखीन दोन वर्षासाठी स्कॉलरशिप वाढवण्यात आली हे तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असावे.

  याशिवाय शर्वरीने महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील अनेक प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत आपल्या गायनाचा ठसा उमटवला आहे. विविध नामांकित सांस्कृतिक आणि संगीत मंचांवरून तिने शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचे स्वतंत्र व यशस्वी सादरीकरण करून रसिकांची मनापासून दाद मिळवली आहे. अल्पवयातच आपल्या सुरेल गायकी, परिपक्व सादरीकरण आणि सातत्यपूर्ण रियाज यांच्या बळावर तिने संगीत क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

     शर्वरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल २२ ऑगस्ट २०२६ रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई येथे आयोजित पदवीदान समारंभात तिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार असून, तिला सुमारे सात प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

शर्वरीच्या या यशामुळे लातूरच्या संगीत क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लातूर अर्बन बँक व अष्टविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीप राठी, ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण तज्ज्ञ अतुलजी देऊळगावकर, ज्येष्ठ सर्जन डॉ. अजित जगताप, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, श्री. दिनकर पाटील, श्री व सौ डोंगरे, श्री.युवराज नळे,श्री. शंभूदेव केंद्रे , अभय शहा , मार्गदर्शक देशमुख दाम्पत्य, यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शर्वरीचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शर्वरी डोंगरेचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून, लातूरच्या सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, अथक मेहनत, सातत्यपूर्ण रियाज, आई-वडिलांचे व समस्त कुटुंबाचे  पाठबळ  यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण शर्वरीने आपल्या कर्तृत्वातून संपूर्ण देशासमोर ठेवले आहे.



Post a Comment

0 Comments