आरोह संगीत अकादमीच्या रिदमला शास्त्रीय गायनासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती जाहीर


लातूर : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दिली जाणारी सेंटर  फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग सेंटर 

( सी सी आर टी ) शिष्यवृत्ती लातूर येथील आरोह संगीत अकादमीची संगीत साधक कुमारी रिदम दत्ता पाटील हिला जाहीर झाली आहे. 

    शास्त्रीय संगीतासारखी समृद्ध परंपरा जपण्याचे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम लातूर येथील 'आरोह संगीत अकादमी' मागील २४ वर्षांपासून अत्यंत निष्ठेने करत आहे.प्राध्यापक शशिकांत देशमुख आणि डॉ. वृषाली देशमुख यांच्यासारख्या अनुभवी गुरूंकडे 'रीतसर' शिक्षण मिळणे हे कोणत्याही शिष्यासाठी भाग्याचे असते. शास्त्रशुद्ध पद्धत आणि कडक शिस्त यामुळेच सादरीकरणात प्रगल्भता येते.संगीतात 'रियाजाला' पर्याय नाही ही बाब सातत्यपूर्ण संगीत साधकांच्या मनावर बिंबवणारे व ती गोष्ट कृतीतून करून घेणारे मार्गदर्शक अशा गुरूंकडे सहा वर्षांचे सातत्यपूर्ण तालीम आणि रोजची स्वरसाधना यामुळेच रिदमने हा टप्पा गाठला आहे. 

    ही लातूरसाठी आणि संगीत क्षेत्रासाठी अतिशय अभिमानास्पद बातमी आहे! CCRT (Center for Cultural Resources and Training) सारख्या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेची शिष्यवृत्ती मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ चार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवणे हे रिदमच्या असामान्य प्रतिभेची आणि मेहनतीची पावती आहे. रिदम च्या या यशामागे तिच्या आई-बाबांचे मोलाचे पाठबळ लाभले आहे.

   आरोह संगीत अकादमीसाठी हा एक सुवर्णक्षण आहे. आजपर्यंत आरोह संगीत अकादमीच्या शर्वरी डोंगरे, सायली टाक,उन्नती मुंडे आणि यावर्षी रिदम पाटील या चार संगीत साधकांना ही केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे शर्वरी व सायलीला प्रोग्रेस रिपोर्ट मधील उत्तम सादरीकरणामुळे पुन्हा दोन वर्षासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. घरामध्ये शास्त्रीय संगीताची कोणतीही परंपरा नसताना केवळ गुरूंच्या मार्गदर्शनामुळे व स्वतःच्या मेहनतीमुळे राष्ट्रीय कला उत्सवामध्ये भारतात प्रथम येण्याचा मान आरोह संगीत अकादमीच्या सायली टाक हिला मिळाला आहे तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मध्यमा पूर्ण परीक्षेत भारतात प्रथम येण्याचा मान शर्वरी डोंगरे हिला मिळाला आहे. अशा यशाने इतर  साधकांनाही शास्त्रीय संगीताकडे वळण्याची प्रेरणा मिळेल. रिदमच्या या यशाबद्दल संगीत क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ कलावंतांनी रसिकांनी रिदमचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments