लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात "ॲडव्होकेट प्रीमियर लीग" या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाजाबरोबरच वकिलांमध्ये क्रीडा संस्कार वृद्धिंगत व्हावेत आणि परस्परांमध्ये बांधिलकी, मैत्री तसेच उत्साह निर्माण व्हावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन होत आहे.
ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्व वकिलांसाठी खुली असून, त्यात 10 ते 12 संघ सहभागी होणार आहेत. जर 10 संघ निश्चित झाले तर 140 खेळाडू आणि 12 संघ निश्चित झाले तर एकूण 168 खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला संघातून संधी मिळावी यासाठी लातूर बार असोसिएशनने काटेकोर नियोजन केले आहे.
खेळाडूंची निवड पद्धत देखील आगळीवेगळी ठेवण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूस "AUCTION" पद्धतीने संघ दिला जाणार आहे. यामुळे सर्वांना समान संधी मिळेल आणि खेळाडूंची गुणवत्ता लक्षात घेऊन संघांची मांडणी केली जाईल. अशा स्वरूपाचा अनोखा प्रयोग वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेत प्रथमच राबवला जात आहे.
संघाची लिलाव पद्धती 14 ऑक्टोबरपासून राबवली जाणार असून, 3 ऑक्टोबरपासून खेळाडूंची नावे नोंदवली जाणार आहेत. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी सर्व वकिलांना आवाहन केले आहे की, ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी त्वरित नोंदणी करावी.
स्पर्धेचे सामने दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे सर्व सामने प्रेक्षकांसाठी खुले असतील तसेच यंदा ही स्पर्धा थेट "LIVE" दाखवण्याचाही मानस आहे. कोर्टातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या वकिलांना खेळाच्या मैदानावर त्यांच्या दुसऱ्या अंगाने बघण्याची ही संधी ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन हे वकिलांच्या समाजजीवनात एक नवा उत्साह निर्माण करणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. क्रीडा हा वकिलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग व्हावा यासाठी अशा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ वकिलांनी मांडले.
लातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. योगेश जगताप, सचिव ॲड. गणेश गोजामगुंडे, उपाध्यक्ष ॲड. संजय जगदाळे, महिला उपाध्यक्ष ॲड. मनीषा दिवे पाटील, लायब्ररी सचिव ॲड. प्रणव रैचूरकर, संयुक्त सचिव ॲड. निलेश मुचाटे, ॲड. अभिलाषा गवारे तसेच खजिनदार ॲड. गणेश कांबळे हे सर्व या स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय आहेत.
नोंदणीसाठी लातूर बार असोसिएशनतर्फे QR कोड व ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी 9022870790 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या क्रिकेट महोत्सवामुळे लातूर जिल्ह्यातील वकिलांना केवळ कायदेशीर क्षेत्रापुरते न राहता क्रीडाक्षेत्रातही आपली गुणवत्ता दाखवण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून वकिलांमध्ये एकात्मता, सामूहिक भावना व बंधुभाव वृद्धिंगत होणार आहे. कोर्टाच्या तणावग्रस्त जीवनात अशा क्रीडा स्पर्धा मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीकरिता मोठे योगदान देतात.
या "ॲडव्होकेट प्रीमियर लीग" मुळे वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील ही क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरणार आहे, यात शंका नाही.


0 Comments