महाराष्ट्रात सट्टेबाजी करणारे अँप तात्काळ हद्दपार करा – अँड. दिग्विजय माकणे यांची सरकारकडे मागणी


 » लातूर  | प्रतिनिधी  :

दि. 30 मे – महाराष्ट्रात सध्या झपाट्याने वाढत असलेल्या ऑनलाइन सट्टेबाजीच्या अ‍ॅप्सवर बंदी घालावी, अशी ठाम मागणी अँड. दिग्विजय हेमंतराव माकणे यांनी केली आहे. ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, "या सट्टेबाज अ‍ॅप्समुळे राज्यातील आणि देशातील लाखो तरुण वाऱ्यावर उधळले जात आहेत. त्यांचे भवितव्य धोक्यात येत असून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे."



तरुणाई सट्ट्याच्या आहारी

जच्या तरुणाईला काहीतरी झटपट मिळवायचं आहे. या मानसिकतेचा गैरफायदा घेत, विविध ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्स सट्टेबाजीच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमावत आहेत. या अ‍ॅप्समध्ये क्रिकेट, फूटबॉल, टेनिस अशा खेळांवर पैसे लावले जातात. हळूहळू तरुणांना त्याची सवय लागते आणि ते त्यातच अडकतात. बँक लोन, कर्ज, घरफोडी, आत्महत्यांचे प्रमाण यातूनच वाढत आहे, हेही माकणे यांनी अधोरेखित केलं.

प्रसिद्ध अभिनेत्यांची जाहिरातमधून फसवणूक

या अ‍ॅप्सची एक धोकादायक बाजू म्हणजे बॉलीवूड व क्रिकेटमधील प्रसिद्ध अभिनेते आणि खेळाडू यांच्यासारखे चेहरे यासाठी जाहिराती करत आहेत. त्यांच्या प्रसिद्धीचा वापर करून सामान्य जनतेला आकर्षित केलं जातं. "या गोष्टींना कायदेशीर अधिकाऱ्यांनी आळा घालणं गरजेचं आहे. सरकारने अशा जाहिरातींवर तात्काळ बंदी आणावी," अशी मागणी अँड. माकणे यांनी केली. 

कायद्याचे उल्लंघन

माकणे म्हणाले, "भारतीय कायद्यांनुसार सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. परंतु ऑनलाइन अ‍ॅप्सच्या आड हे उद्योग खुलेआम चालू आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी त्वरित लक्ष घालून या अ‍ॅप्सवर बंदी आणावी, अन्यथा देशाची भावी पिढी बरबाद होईल." त्यांनी यासाठी सायबर क्राइम यंत्रणेला अधिक मजबूत करण्याची आणि संबंधित अ‍ॅप्सवर कारवाई करण्याची गरजही व्यक्त केली.

आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक त्रास

सट्टेबाजीमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. घरातली आर्थिक परिस्थिती कोलमडते, तणाव वाढतो, नातेसंबंध बिघडतात. अनेक वेळा तरुण फसवले जातात, लाखो रुपये गमावतात आणि शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. यामुळे हा फक्त वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय आपत्तीचा मुद्दा आहे, असं माकणे म्हणाले.

युवकांना दिशा द्या

"सरकारने तरुणांना सकारात्मक दिशा देण्यासाठी स्टार्टअप, शिक्षण, उद्योजकता, क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करावी. तरुणांनी झटपट श्रीमंत होण्याच्या भ्रमात न पडता मेहनतीचा मार्ग निवडावा," असा सल्ला माकणे यांनी दिला.

तात्काळ बंदीची मागणी

"मी महाराष्ट्र सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आग्रहाने मागणी करतो की, Dream11, My11Circle, FairPlay, Lotus365, Dafabet यांसारख्या सट्टेबाजीस प्रोत्साहन देणाऱ्या सर्व अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालावी. त्यांचा प्रचार करणाऱ्या कलाकारांवर दंडात्मक कारवाई केली जावी," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Post a Comment

0 Comments