शिवछत्रपती पुरस्कारासाठी निवड झालेल्या विराज परदेशी यांचा थरारक प्रवास : स्वप्नपूर्तीचा दिवस!



 » पुणे  | प्रतिनिधी :

पुणे (धायरी) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू विराज मिलनकुमार परदेशी यांनी आपल्या क्रीडा प्रवासात आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान "छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार 2023-24" साठी त्यांची नुकतीच निवड झाली असून, या यशामुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विराज यांचा क्रीडा प्रवास केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर संघर्षमयही राहिला आहे. वयाच्या केवळ सहाव्या वर्षी पुण्यातील टिळक तलावावर पोहण्याचा सराव सुरू करून त्यांनी अनेक राज्यस्तरीय पदके पटकावत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

त्यांच्या यशस्वी क्रीडा कारकिर्दीची सुरुवात फिटनेससाठी वडील मीलन परदेशी (राष्ट्रीय कुस्तीपटू) यांच्या मार्गदर्शनाखाली धावणे, पोहणे आणि सायकलिंग यांच्या सरावाने झाली. या सरावातून विराज ‘ट्रायथलॉन’ या क्रीडा प्रकाराकडे वळले. दीड किलोमीटर स्वीमिंग, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग यांचा समावेश असलेल्या या कठीण स्पर्धेत त्यांनी इंदूर येथे राष्ट्रीय उपविजेतेपद पटकावले आणि याच वेळी ‘मॉडर्न पेंटॅथलॉन’ या जागतिक पातळीवरील क्रीडा प्रकाराची सुरुवात झाली.

स्वीमिंग, तलवारबाजी, अश्वारोहण, पिस्तूल शूटिंग आणि रनिंग या पाच विविध प्रकारांमध्ये कौशल्य पणाला लावावे लागणारा मॉडर्न पेंटॅथलॉन हा खेळ 1905 पासून ऑलिंपिकमध्ये समाविष्ट आहे. याच क्रीडा प्रकारात विराज परदेशी यांनी तीन वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावत भारताच्या वतीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग घेतला आहे.

त्यांनी दुबई येथे ज्युनिअर स्पर्धेत ब्रॉन्झ पदक, तर फुकेट येथे झालेल्या एशियन बीच गेम्स साठी भारतीय संघात निवड मिळवली. बीजिंग (चीन), बेलारूस आणि किर्गीस्तान येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत किर्गीस्तानमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावले. त्यानंतर इजिप्त येथे वर्ल्ड कप स्पर्धेत 118 वा क्रमांक मिळवत भारताचे पहिले क्रीडापटू म्हणून नोंद झाली.

त्यांचा सराव फक्त भारतात मर्यादित न राहता हरियाणा (करनाल), बँकॉक, इजिप्त आणि हंगेरी येथेही झाला. हे सर्व यश मिळवण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण प्रयत्न, संघर्ष, आर्थिक मर्यादा, न्यायालयीन लढा, आणि अपार कष्ट झेलावे लागले. अनेकदा आशा-निराशेच्या खेळातून जाऊन अखेर हे स्वप्न साकार झाले.


विराज यांचे वडील पै. मिलनकुमार परदेशी हे स्वतः राष्ट्रीय विजेते मल्ल आहेत. त्यांच्या क्रीडावेडाची आणि संघर्षशीलतेची परंपरा विराजने पुढे नेली आहे. पणजोबा गणपतसिंह परदेशी हे स्वातंत्र्य सेनानी, चुलत आजोबा मल्लमहर्षी पै. प्रतापसिंह हे भारतातील नामवंत मल्ल, तर आजोबा वसंतसिंह 1974 चे उपमहाराष्ट्र केसरी होते. क्रीडाप्रेमाची ही उज्ज्वल परंपरा विराजने आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी आणि अपार मेहनतीने पुढे नेली आहे.

या यशस्वी वाटचालीत नामदेवराव शिरगावकर, विठ्ठलराव शिरगावकर, शेखर खासनीस, पुनीत बालन, गुणेश पुरंदरे, रणजीत चामले, प्रभिर रॉय, सौरभ देशपांडे, तपन पानिग्रही, डॉ. अजित मापारी, हर्षद इनामदार, संतोष पवार, भास्कर भोसले, विनय मराठे आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या यशाबाबत बोलताना विराज म्हणाले, "हा पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना व कुटुंबियांना अर्पण करतो. 18 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे."

या प्रवासात त्यांच्या आई सौ. बेला परदेशी यांचे योगदानही मोठे आहे. ठाणे असो वा बँकॉक, महिनोमहिने सोबत राहून त्यांनी विराजचा आत्मविश्वास वाढवला. ऍड. केतन परदेशी (मुंबई उच्च न्यायालय व पुणे सत्र न्यायालयातील प्रॅक्टिसिंग वकील) यांचे बंधू असलेल्या विराजला कुटुंबाचे सकस पाठबळ लाभले.

शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभ बालेवाडी, पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


या प्रेरणादायी प्रवासातून हेच अधोरेखित होते की जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने कोणतीही शिखरे सर करता येतात. विराज परदेशी यांच्या यशाचा हा थरारक प्रवास महाराष्ट्रातील नवउमेद क्रीडापटूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!




Post a Comment

0 Comments