ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय निरगुडकर यांचा विश्वनाथ फौंडेशनच्या वतीने गौरव

 



» पुणे | प्रतिनिधी : दैनिक शिवजागर

जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय शंकर निरगुडकर यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विश्वनाथ फौंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यालयात मनोभावे शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्याला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

ॲड. धनंजय निरगुडकर यांचे वडीलही सुप्रसिद्ध विधिज्ञ होते. वकिलीचे धडे त्यांना वडिलांकडून मिळाले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे  महानगरात स्वतःचे साम्राज्य उभारण्याचा त्यांचा प्रवास खडतर होता. वडिलांच्या नावाचा नावलौकिक वृद्धिंगत करणं ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या मेहनतीमुळे वकिली व्यवसायात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले आहे.

कायदा क्षेत्रातील अथांग ज्ञान असलेले ॲड. निरगुडकर यांना त्यांचा प्रभावी युक्तिवाद आणि कायद्यावरील प्रगल्भ समज यासाठी ओळखले जाते. गरीब व वंचित घटकांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य करून न्याय मिळवून देणे हा त्यांचा सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. न्यायासाठी झटणारा आणि तळमळीने लढा देणारा वकील म्हणून त्यांना ओळखले जाते.

ॲड. निरगुडकर यांचा स्वभाव मितभाषी असला तरी नवोदित वकिलांसाठी ते सदैव प्रेरणा आहेत. "ज्ञान वाटल्याने वाढते" या तत्त्वाचा अवलंब करत ते तरुण वकिलांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असतात. कायद्या विषयीचे त्यांचे सखोल ज्ञान आणि अनुभव नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे.

ॲड. धनंजय निरगुडकर यांचे थोरले भाऊ ॲड. सूर्यकुमार शंकर निरगुडकर देखील ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. निरगुडकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीपर्यंत वकिली व्यवसाय सुरू आहे. ॲड. ऋग्वेद सूर्यकुमार निरगुडकर यांच्यासह अनेक कुटुंबीयांनीही या क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. हा कुटुंबाचा गौरवशाली वारसा पाहता निरगुडकर कुटुंब कायदा क्षेत्रात एक आदर्श आहे.

ॲड. धनंजय निरगुडकर यांनी केवळ कायदा क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही भरीव योगदान दिले आहे. अनेक वेळा विनामूल्य वकिली सेवा देऊन त्यांनी गरजू लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या तळमळीच्या कार्याची दखल घेऊन विश्वनाथ फौंडेशनने गौरव करून त्यांचा सन्मान केला. हा सन्मान त्यांच्याबद्दल असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

विश्वनाथ फौंडेशनचे सचिव ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या भाषणात  निरगुडकर यांचे कौतुक करताना सांगितले की, "एवढ्या मोठ्या विचारवंताचा सन्मान करणे हे आमच्यासाठी भाग्य आहे. त्यांचे समाजासाठी असलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."

या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्यांमध्ये ॲड. सूर्यकुमार शंकर निरगुडकर, ॲड. ऋग्वेद सूर्यकुमार  निरगुडकर, चेअरमन ॲड. हेमंत गुंड, ॲड. संतोष बबन सोमवंशी, ॲड. कनक विवेक देशपांडे, ॲड. अनुष्का पराग बंगाळे, ॲड. राजश्री फकिरा सकट, ॲड. एच. वाय. शेख, ॲड. अभिमन्यू नारायण शिंदे, ॲड. गणपत दामोदर फलके, ॲड. प्रियांका निरगुडकर, ॲड. उज्ज्वल निरगुडकर, ॲड. केतकी देशपांडे, ॲड. सिद्धार्थ देशपांडे, ॲड. मोहन शंकर मोरे, ॲड. ऊर्जा प्रतिसाद नेऊरगावकर आदींचा समावेश होता.

ॲड. धनंजय निरगुडकर यांचा प्रवास संघर्षमय असूनही प्रेरणादायी आहे. कठीण प्रसंगांना न जुमानता सत्यासाठी लढा देण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांना समाजात आदर मिळाला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, अशी प्रेरणा ते सर्वांना देतात.

सामाजिक बांधिलकी जोपासत ॲड. धनंजय निरगुडकर यांची वाटचाल सातत्याने सुरु आहे. भविष्यातही ते कायदा व समाजसेवा क्षेत्रात आपले योगदान देत राहतील, याबाबत कोणतीही शंका नाही. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासामुळे अनेकांना नव्या उंचीवर जाण्यास मदत होईल. विश्वनाथ फौंडेशनने केलेला त्यांचा गौरव त्यांना अधिक कार्यप्रवण करेल, यात शंका नाही.




Post a Comment

0 Comments