मुंबई, (प्रतिनिधी)__दि २७ फेब्रु २०२५– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विभागाचे प्रदेश प्रमुख सुरेश यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. यादव यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाच्या ध्येय-धोरणांनुसार संघटनात्मक बांधणी मजबूत केली. राज्यभरात विविध उपक्रम, आंदोलन, प्रशिक्षण शिबिरे आणि पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पक्षाच्या प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय दिल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. "एखाद्या पदावर दीर्घकाळ राहण्यापेक्षा नवीन लोकांना संधी दिली पाहिजे," असे मत व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विभागाच्या प्रदेश प्रमुख पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयाने पक्षाच्या पुढील संघटनात्मक घडामोडींना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments