अंबाजोगाई (वार्ताहर) शिवसृष्टी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था धांडेगाव (ता.जि.जालना) यांच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी गावच्या सरपंच सौ.शोभा गोकुळराव कदम यांना नुकताच एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.शोभाताई कदम यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी गावच्या सरपंच सौ.शोभाताई गोकुळ कदम यांना त्यांनी कोविडच्या मागील दोन वर्षात सरपंच म्हणून आपली भूमिका जबाबदारी यशस्वीरित्या निभावली. गावकर्यांच्या भवितव्याचा विचार करून कार्य केले, तसेच कोरोना सारख्या अचानक आलेल्या संकटाचा न डगमगता कोदरी ग्रामस्थांच्या सहकार्याने मुकाबला करून प्रशंसनीय कार्य केले. त्यांचे हे कार्य इतर लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरणारे असेच आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून जालना येथील शिवसृष्टी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. सरपंच शोभाताई कदम यांना सदर पुरस्कार एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सौ.शोभाताई यांचे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्याकडून ही सौ.कदम यांचे स्वागत करण्यात येत आहे. एक सरपंच म्हणून सौ.कदम यांनी सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड काळात आवश्यकतेनुसार रॅपीड अँन्टीजन टेस्ट, ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण, आरोग्य तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासणे प्रत्येक कुटूंबाला कोरोना सेफ्टी किट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे, गरजेनुसार स्वतंत्र विलगीकरण करणे, गाव कोरोनामुक्त कसे होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, शासन निर्देशासनूसार नियमांचे पालन करणे, गावकर्यांना धीर देणे, शासन प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील दुवा म्हणून काम करणे या सर्व जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांच्या या योगदानाची दखल शिवसृष्टी संस्थेच्या वतीने घेण्यात आली व त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल व फेटा असे आहे.
आदर्श सरपंच पुरस्काराचे श्रेय कोदरी ग्रामस्थांना :
====================
कोविड काळात सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कोदरी ग्रामस्थ, तालुक्यातील शासकीय, प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येत कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्या प्रार्दुभावापासून मोठ्या प्रमाणावर बचाव होवू शकला. गावातील विविध लोकोपयोगी कार्य होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य सातत्याने लाभले आहे. कोदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात येते. गावामध्ये विकासात्मक कामे करण्यावर नेहमीच ग्रामपंचायतीचा भर आहे. जनजागृती, लसीकरण, मोहिम, राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. गावात सामाजिक सौहार्द ठेवून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, स्मशानभूमी ही सर्व कामे करण्यासाठी व प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. शिवसृष्टी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला. याचे संपुर्ण श्रेय हे कोदरी ग्रामस्थांचे आहे. पुढील काळातही जनसेवेचे कार्य करण्यासाठी कोदरी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील.
- सौ.शोभाताई गोकुळ कदम (सरपंच, कोदरी ता.अंबाजोगाई जि.बीड.)
0 Comments